

दीपेश सुराणा :
पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : कोट्यवधी रुपये खर्च करूनही शहरातील रस्त्यांच्या योग्य डागडुजीकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. समतल नसलेले डांबरी रस्ते, रस्त्यावर आलेले चेंबर, डांबरीकरणानंतरही काही ठिकाणी पडलेले खड्डे यामुळे वाहनचालकांना दररोज वाहने चालविताना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्यांना एकीकडे पाठीचे विकार जडत असताना वाहनांचे आयुष्यदेखील घटत चालले आहे. महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी शहरातील रस्त्यांची डागडुजी करण्यात येते. पावसाळ्यात दरवर्षी खड्डे पडलेले रस्ते हे चित्र पाहण्यास मिळते. पावसाळ्यापूर्वी किंवा पावसाळ्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती केली जाते. रस्त्यांच्या दुरुस्तीचे कामे करत असताना बर्याचदा समतल डांबरी रस्ते केले जात नाहीत. काही ठिकाणी रस्त्याच्या वर चेंबर आलेले दिसतात. तर, काही ठिकाणी डांबरीकरणानंतर देखील रस्त्यावर खड्डे पडल्याचे चित्र पाहण्यास मिळते. त्यामुळे रस्त्यांच्या डागडुजीबाबत शंका निर्माण होते.
खोदकामाचा मोठा अडथळा
रस्त्यांचे डांबरीकरण झाल्यानंतर विविध खोदकामांसाठी सातत्याने रस्ते खोदले जातात. जलवाहिनी, सांडपाणी नलिका टाकणे, भूमिगत विद्युततारा हलविणे किंवा दुरुस्ती, पावसाळी गटार टाकणे अशा विविध कामांसाठी खोदकाम करण्यात येते. रस्त्यावर खोदकाम केल्यानंतर त्याची पुन्हा व्यवस्थित डागडुजी होत नाही. ज्या भागात खोदकाम झालेले असते तिथे योग्य पद्धतीने डांबरीकरण होत नाही. काही ठिकाणी तर डांबरीकरणाचा पत्ताच नसतो. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे वाहनचालकांना त्यामुळे रस्त्यावर वाहन चालविणेही एक मोठी कसरत ठरते.
शहरातील रस्त्यांची सद्यःस्थिती
शहरातील काही अंतर्गत रस्त्यांची पाहणी केली असता प्रामुख्याने पुढील बाबी निदर्शनास आल्या. चिंचवड स्टेशन येथे पुणे-मुंबई महामार्गावर रस्त्याच्या एका बाजूला रस्त्यावर चेंबर वर आल्याचे आढळले. काळभोरनगर येथेही दोन चेंबर रस्त्यावर आल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. त्याचप्रमाणे, आकुर्डी, गंगानगर, जाधववाडी-चिखली, पिंपरी ग्रेडसेपरेटर आदी ठिकाणी उखडलेले डांबरीकरण, समतल नसलेले रस्ते अशी परिस्थिती पाहण्यास मिळाली. डांगे चौक-थेरगाव, वाकड, काळेवाडी अशा विविध भागांतही रस्त्यांची योग्य पद्धतीने दुरुस्ती झाली नसल्याचे दिसत आहे.
पाठीच्या विकारात वाढ
शहरातील खराब रस्त्यांवरुन प्रवास करताना वाहनचालकांना त्याचा त्रास होत आहे. अचानक खड्ड्यातून वाहन गेल्यामुळे पाठीत चमक भरते. स्पाँडिलायटिसचा त्रास होतो. मणक्यांवर त्रास जाणवतो. संधीवात असलेल्या रुग्णांना यामुळे आणखी त्रास बळावतो. पाठीच्या कण्याचे हाड, कार्टिलेज आणि डिस्कवरदेखील त्याचा परिणाम होत असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.
रस्त्यांचे काम दिलेल्या कंत्राटदाराकडून वर्षभराच्या कालावधीत रस्ते खराब झाल्यास दुरुस्ती करण्यात येते. जलवाहिनी, सांडपाणी नलिका टाकणे व अन्य विविध कारणांसाठी रस्ते खोदल्यामुळे समतल डांबरीकरण होत नाही. महापालिकेकडून खराब झालेल्या रस्त्यांचे डांबरीकरण आणि डागडुजी केली जाते.
-मकरंद निकम, शहर अभियंताशहरातील रस्त्यांमध्ये पडलेले खड्डे, ओबडधोबड रस्ते आदींमुळे वाहनचालकांना वाहने चालविताना पाठीचे विकार बळावत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. पाठीत चमक येणे, स्पाँडिलायटिसचा त्रास होणे, संधीवात झालेल्या रुग्णांचा त्रास वाढण्याचे प्रकार यामुळे घडत आहेत. तसे रुग्ण आमच्याकडे दररोज तपासणीसाठी येत आहेत. त्यामुळे शहरातील रस्ते चांगले होणे गरजेचे आहे.
– डॉ. प्रशांत टोपणे, अस्थिरोगतज्ज्ञ.