

पुणे; पुढारी वृत्तसेवा : 'जगातील एकूण लोकसंख्येच्या 55 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या ही शहरांमध्ये राहते. परंतु, जगातील एकूण जागेच्या केवळ तीन टक्के जागेवर शहरी भाग आहे. तरीही सर्वाधिक उत्पन्न याच शहरी भागातून मिळते, त्यामुळे शहरांच्या पायाभूत सुविधांवर भर द्यायला हवा. मात्र, यासाठी तात्पुरते उपाय न करता शाश्वत उपायांचा अवलंब करावा,' असे मत सुरत महापालिकेच्या आयुक्त शालिनी अगरवाल यांनी व्यक्त केले. तर, 'जी-20'निमित्त आयोजित या व्याख्यानात सर्वच तज्ज्ञांनी शाश्वत विकासाचा अवलंब गरजेचा आहे,' असे त्यांनी सांगितले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होत असलेल्या 'जी-20' परिषदेच्या अनुषंगाने विद्यापीठाने 'जन भागीदारी' या कार्यक्रमांतर्गत 'भविष्यातील शहरांसाठी' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. या वेळी आशियाई विकास बँकेचे शहरतज्ज्ञ संजय ग्रोवर, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे, अधिष्ठाता डॉ. विजय खरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
शालिनी अगरवाल म्हणाल्या, 'भविष्यातील अंदाज बांधता 2050 पर्यंत शहरी भागातील नागरिकांची संख्या अजून वाढणार आहे. त्या दिशेने आताच आपण पायाभूत सुविधांचा विचार करायला हवा. हे करीत असताना पर्यावरण हा धागा धरून शाश्वत विकासाचा मार्ग स्वीकारावा.' केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या आर्थिक घडामोडी या विभागातील संयुक्त सचिव सॉलोमन अरोकिराज यांनी आपल्या स्वागतपर भाषणात 'जी-20' परिषदेविषयी विचार मांडले.
\तसेच, केंद्रीय वित्त मंत्रालयातील सल्लागार वीरेंदर सिंग यांनी 'भारताच्या नेतृत्वाखालील जी-20' या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी 'जी-20'चा इतिहास, त्याची व्यापकता, परिषदेची कार्यपद्धती, याविषयी माहिती दिली. तसेच, भारताच्या नेतृत्वाखाली होणार्या या परिषदेची रूपरेषा कोणत्या मुद्द्यावर ठरविण्यात आली, याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, जवळपास 56 शहरांत वर्षभरात 200 बैठका होणार आहेत. जगातील 85 टक्के विकास दर हा या जी-20 देशांकडे एकवटला असून, 75 टक्के व्यापार या देशांमध्ये चालतो, त्यामुळे ही परिषद अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
'शहरांचा विकास गरजेचा आहेच; पण त्यासोबत ग्रामीण भागाचाही विकास गरजेचा आहे. वाहतूक, आरोग्य, अन्नसुरक्षा, सायबर आणि माणसाची सुरक्षा, पर्यावरण या सर्व विषयांवर उच्च शिक्षणात संशोधन होणे गरजेचे आहे. प्रत्येक विषयाला तंत्रज्ञानाची जोड आवश्यक आहे. बहुआयामी दृष्टिकोन ठेवतच सर्व क्षेत्रांत काम करणे गरजेचे आहे. 'जी-20'च्या निमित्ताने या पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्याची संधी विद्यापीठाला मिळाली, याचा आम्हाला आनंद आहे.'
– डॉ. कारभारी काळे, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ