

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी, महात्मा फुले जनआरोग्य योजना आदींच्या माध्यमातून राज्य शासन सर्वसामान्य जनतेच्या वैद्यकीय उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात मदत करीत आहे. स्वस्त उपचार म्हणजे चांगले नाही, अशी धारणा निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी काळात निसर्गोपचाराच्या प्रचाराबरोबरच विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्राकांत पाटील यांनी केले.
राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था पुणे येथे हृदयमित्र प्रतिष्ठानच्या वतीने 'निसर्गोपचार भूषण' पुरस्कार वितरण कार्यक्रमात पाटील बोलत होते. माजी आमदार योगेश टिळेकर, निसर्गोपचार संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ. के. सत्यलक्ष्मी, हृदयमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत मुंदडा उपस्थित होते.
इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अनंत बिरादार म्हणाले की, देशविदेशात निसर्गोपचार, योगाचा प्रसार करण्याचे काम करण्यात येत आहे. केंद्र शासनाकडूनही स्वतंत्र आयुष मंत्रालयाची स्थापना, पर्यायी उपचारपद्धतींचा प्रचार व प्रसार करण्यात येत आहे.
पाटील पुढे म्हणाले की, कोरोना परिस्थितीने माणसाला वैद्यकीय उपचाराचे महत्त्व लक्षात आणून दिले. आज आजारांवरील उपचारांसाठी, औषधांसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. हे पाहता निसर्गोपचार, प्राणायाम, मेडिटेशन, हीलिंग उपचारपद्धती आदी पर्यायी उपचारपद्धतींना प्रोत्साहन दिले पाहिजे.