पुणे : साखर उद्योगात पारदर्शकतेची गरज ; साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे मत

पुणे : साखर उद्योगात पारदर्शकतेची गरज ; साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे मत

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  जागतिक पातळीवर साखर उत्पादनात भारत,  ब्राझिलनंतर  थेट महाराष्ट्र राज्य आघाडीवर आलेले आहे. त्यामुळे कृषी  आणि कृषीवर आधारित उद्योगातून मोठा रोजगार देण्याची क्षमता आपल्याकडे आहे. जागतिक पातळीवर महाराष्ट्राला पुढे न्यायचे असेल, तर साखर उद्योगात अधिक पारदर्शकता आणून काम करण्याची गरज असल्याचे मत राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले.

येथील को-जनरेशन असोसिएशनकडून 'साखर कारखाने आणि वितरकांसाठी 'भविष्यातील नाविन्यपूर्ण ऊर्जा केंद्र' या विषयावर एक दिवशीय बैठक वाकड येथे एका हॉटेलात शुक्रवारी (दि.3) दिवसभर झाली. अध्यक्षस्थानी दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर हे होते. त्या वेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे व्यवस्थापकीय संचालक अजित चौगुले, प्रांज इंडस्ट्रीच्या जैव ऊर्जा विभागाचे अध्यक्ष अतुल मुळे, साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, महाऊर्जाचे सहायक संचालक पंकज तगलपल्लेवार, राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ व साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले, केंद्राने बायोफ्युअलची नवे धोरण आणले असून, अन्नदाता शेतकर्‍यांला ऊर्जादाता होण्याची संधी आहे. त्यातून प्रदूषण कमी करून हरित ऊर्जा देण्याची साखर उद्योगास संधी निर्माण झाल्याने साखर कारखान्यांनी अभ्यास करून त्याचा फायदा घेतला पाहिजे.  साखर महासंघाचे प्रकाश नाईकनवरे, प्रांज इंडस्ट्रीचे अतुल मुळे, महाऊर्जाचे पंकज तगलपल्लेवार यांनीही मनोगत व्यक्त केले. संजय खताळ यांनी प्रास्ताविक केले. अनिता खताळ यांनी सूत्रसंचालन केले. श्रीकांत शिंदे यांनी आभार मानले.

एप्रिलनंतर साखरेची दरवाढ शक्य
राज्यात चालू वर्ष 2022-23 मध्ये आपण साखरेचे उत्पादन 138 लाख टन होण्याचा प्राथमिक अंदाज होता. साखर कारखान्यांच्या आढावा बैठका घेतल्या असता प्रतिहेक्टरी उत्पादकतेत घट आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अंदाजापेक्षा सुमारे 10 लाख टनांनी साखर उत्पादन कमी होणार आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यानंतर साखरेचे दर वाढण्याची शक्यताही साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी या वेळी व्यक्त केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news