

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहराला सांस्कृतिक राजधानी म्हटले जात असताना आता रुजणार्या क्रीडा संस्कृतीचे शहर म्हणून ओळख निर्माण करीत आहे. अशा शहरात खेळाडूंसाठी चांगल्या सुविधा पुरविणे आवश्यक आहे. दै. 'पुढारी' च्या वतीने अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करून महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून, हा नक्कीच कौतुकास्पद उपक्रम आहे, असे प्रतिपादन माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले.
दै. 'पुढारी' आयोजित 'राईज अप' महिलांच्या अॅथलेटिक्स स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी या कार्यक्रमाला सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व चेअरमन प्रा. डॉ. संजय चोरडिया, एसकेपी शैक्षणिक संकुल, बालेवाडी आणि श्री खंडेराज प्रतिष्ठानचे चेअरमन डॉ. सागर बालवडकर, दिशा अॅडर्व्हटायझिंगचे संस्थापक रवी देशमुख, अॅथलेटिक्स प्रशिक्षक हर्षल निकम यांसह मान्यवर उपस्थित होते.
जगताप म्हणाले, मीडियाच्या माध्यमातून दै. 'पुढारी' सारख्या वृत्तपत्राने क्रीडा क्षेत्रात पुढाकार घेऊन केवळ महिलांसाठी स्पर्धा भरवून महिलांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. नक्कीच हा उपक्रम एका नव्या उंचीवर पोहोचेल. स्पर्धेत यश-अपयश येत असते. मात्र, अपयशाने खचून न जाता पुन्हा जिद्दीने खेळावर लक्ष केंद्रित करावे. खेळाडूंच्या सोयी-सुविधेसाठी केंद्र, राज्य आणि महापालिकेमध्ये कोणाचीही सत्ता असली तरी पुढाकार घेणे गरजेचे आहे. हीच आपल्या देशाची आगामी मोठी संपत्ती आहे.
चोरडिया म्हणाले, प्रत्येक खेळामध्ये यश आणि अपयश येत असते. परंतु, यश मिळालेल्या खेळाडूंनी नव्या विक्रमासाठी तर अपयश मिळालेल्या खेळाडूंनी खचून न जाता पुन्हा उभारी घ्यावी. दै. 'पुढारी' ने महिलांसाठी घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पदच आहे.
बालवडकर म्हणाले, पुणे शहराची एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे.
त्यामध्ये क्रीडा व संस्कृती जोपासणारे आणि जपणारे शहर म्हणून नावारूपाला पुढे येत आहे. अशा शहरामध्ये दै. 'पुढारी' ने केवळ महिलांसाठी स्पर्धा आयोजित करीत महिलांचा मोठा सन्मान केला आहे. देशमुख म्हणाले, दै. 'पुढारी' च्या वतीने आयोजित महिलांच्या या स्पर्धा आणि उपक्रमाला महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून हेच दै. 'पुढारी' चे मोठे यश आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरिश हिंगणे यांनी तर सूत्रसंचालन रूपचंद पवार यांनी केले.
दै. 'पुढारी' च्या वतीने महिलांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने आयोजित केलेल्या या स्पर्धा हा खरेच स्तुत्य उपक्रम आहे. आठ विविध क्रीडा स्पर्धा एका माध्यम समूहाने भरविणे हे प्रथमच पुणे शहरात घडत आहे. आगामी काळात दै. 'पुढारी' ने अजून काही खेळांचा समावेश करावा. क्रीडा विभागाच्या वतीने अपेक्षित सर्व सहकार्य या स्पर्धांना केले जाईल.
– महादेव कसगावडे, प्रभारी उपसंचालक,
विभागीय क्रीडा संकुल तथा
जिल्हा क्रीडा अधिकारी, पुणे