

Yugendra Pawar
पुणे : राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेल्या पवार कुटुंबात यंदा आनंदाचा माहोल आहे. पवार घराण्यात एकाच वर्षी दोन विवाहसोहळे पार पडणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचा साखरपुडा एप्रिल महिन्यात झाला होता. त्यानंतर आता अजित पवार यांच्याविरोधात राजकीय मैदानात उतरलेले त्यांचे सख्खे पुतणे, श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार यांचही लग्न ठरलं आहे. युगेंद्र पवार यांनी गुपचुप साखरपुडा उरकला असून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर युगेंद्र यांनी काका अजित पवार यांच्यासोबत न जाता शरद पवार यांच्यासोबत राहणे पसंत केले होते. विधानसभेला तर अजित पवार यांच्या विरुद्धच शड्डू ठोकला होता. युगेंद्र यांचा वाढदिवस २२ एप्रिल रोजी बारामतीतील गोविंदबागेत साजरा करण्यात आला होता. त्यावेळी केक कापल्यानंतर युगेंद्र यांचे आजोबा म्हणजेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी "एकट्याचं अभिनंदन किती दिवस करायचं? आम्हाला अक्षदा टाकू द्या, व्यक्तिगत जीवनात आधार लागतो आणि घरातल्याशिवाय दुसरा आधार उपयोगी पडत नसतो," असा सल्ला दिला होता. माझ्या म्हणण्याचा ते (युगेंद्र) गांभिर्याने विचार करतील, अशी अपेक्षाही पवार यांनी व्यक्त केली होती. अखेर युगेंद्र यांनी आजोबांचं ऐकलं आणि साखरपुडा उरकला.
युगेंद्र यांची होणारी पत्नी तनिष्का प्रभू ही मुंबईची आहे. तिने परदेशात शिक्षण पूर्ण केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर युगेंद्र आणि तनिष्काचा फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोत तनिष्का आणि युगेंद्र अंगठ्या दाखवत एकमेकांच्या नव्या नात्याचा आनंद साजरा करताना दिसत आहेत.