

पुणे: संगणक अभियंत्याला मारहाण करत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या गजा मारणे व फरारी रूपेश मारणे या दोघांनी आपल्या साथीदारांना, ‘मस्ती आलीय साल्याला... मारा...’ असे म्हणत चिथावणी दिल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली. फिर्यादी संगणक अभियंता व आरोपी यांमध्ये जुने वाद आहेत का, यादृष्टीने तपास करायचा असल्याने मारणेला पोलिस कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी केली. त्यावर विशेष ‘मकोका’ न्यायालयाने गजा मारणेला 3 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
कोथरूड परिसरातील मारणे टोळीतील काही सराइतांनी देवेंद्र जोग नावाच्या तरुणाला बेदम मारहाण केली. या प्रकरणात मारणेसह पाच जणांविरोधात गुन्हा झाला आहे. त्यांपैकी तीन जणांची रवानगी येरवडा कारागृहात झाली आहे. तर, रूपेश मारणे व बाब्या ऊर्फ श्रीकांत संभाजी पवार हे अद्याप फरार आहेत.
या प्रकरणाची पुणे पोलिसांनी गंभीर दखल घेत सर्व आरोपींवर ’मकोका’ कारवाई केली आहे. त्यानंतर गजा मारणे स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाला. या प्रकरणाचा संपूर्ण तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यानुसार विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात मंगळवारी दुपारी गजा मारणेला गुन्हे शाखेने हजर केले.
मारणे सराईत, भरचौकात दिली जिवे मारण्याची धमकी
सरकार पक्षाच्या वतीने युक्तिवाद करताना अॅड. विलास पठारे म्हणाले की, गजा मारणे हा सराईत गुन्हेगार आहे. त्यानेच साथीदारांना तक्रारदार तरुणाला भर चौकात जिवे मारण्यासाठी चिथावणी दिली. त्याच्या साथीदारांचा पोलिस शोध घेत असून, त्याबाबत तो उडवाउडवीची उत्तरे देत आहे. त्याच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण सुरू असून, घटनास्थळावरचे सीसीटीव्ही चित्रीकरण पडताळून इतर साथीदार असल्यास त्यांची नावे निष्पन्न करायची आहेत.
आरोपी हा संघटित गुन्हेगारी करणार्या टोळीचा म्होरक्या असून, इतर आरोपी सदस्य आहेत. त्यांच्यावर विविध गंभीर गुन्हे दाखल आहे. त्यांनी अशा प्रकारे संघटित गुन्हेगारी करून बेकायदा मालमत्ता जमवली आहे का? याबाबत तपास करायचा आहे.
‘चिथावणी दिल्याचा उल्लेख जबाबात नाही’
बचाव पक्षातर्फे युक्तिवाद करताना अॅड. विजयसिंह ठोंबरे म्हणाले की, पोलिसांनी गजा मारणेला खोट्या गुन्ह्यात गोवले असून, किरकोळ मारहाणीच्या गुन्ह्यात जिवे मारण्याचे व ‘मकोका’चे कलम लावले आहे. आरोपीने चिथावणी दिल्याचा उल्लेख तक्रारदाराच्या जबाबात नाही. सीसीटीव्ही चित्रीकरणातही आरोपी दिसत नाही. तसेच, तो स्वतःहून हजर झाला असतानाही त्याला फरशीवर बसवून नकळत छायाचित्र काढून व्हायरल केले जात आहे. त्याला औषधोपचार नाकारले जातात. हे अटक आरोपीच्या मूलभूत मानवाधिकाराचे उल्लंघन असून, याबाबत उच्च न्यायालयात दाद मागणार आहे, अशी तक्रारही अॅड. ठोंबरे यांनी न्यायालयात केली.