

नायगाव: शेतातील ज्वारी काढून झाल्यानंतर मशिनमध्ये मळणी करीत असताना शेतकरी महिलेचे डोके अडकून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. डोक्याला बाधलेले स्कार्फ मशिनच्या चक्रात अडकले. त्याबरोबर महिला मशिनमध्ये ओढल्या गेल्या. त्यांच्या सोबत काम करणाऱ्या घरातील व्यक्तींना काही कळायच्या आत शिर एका बाजूला आणि शरीर दुसऱ्या बाजूला फेकले गेले.
मंगल तुकाराम कुंभारकर (वय 55, रा. वनपुरी, ता. पुरंदर) असे या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत दत्तात्रय रोहिदास यादव (रा. माळशिरस, ता. पुरदर) यांनी जेजुरी पोलिस ठाण्यात माहिती दिली. अधिक माहितीनुसार, मंगल कुंभारकर या त्यांचा मुलगा विकास कुंभारकर असे माळशिरसमधील पाटीलवस्ती येथील शेतामध्ये ज्वारीची कणसे मळणी मशिनमध्ये टाकून ज्वारीची मळणी करीत होते.
दरम्यान, मशिनच्या खाली पडलेली कणसे गोळा करून मशिनमध्ये टाकताना मंगल यांच्या डोक्याला बांधलेले स्कार्फ, अंगातील शर्ट आणि डोक्याचे केस मळणी टॅक्टरच्या मागच्या बाजूकडील शाप्ट व मळणी मशिनचे जॉइन्टमध्ये अडकल्याने त्या मशिनमध्ये ओढल्या गेल्या. त्यांचे डोके मशिनमध्ये अडकल्याचे दिसताच त्याच वेगाने मशिन बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मशिन बंद करण्यापूर्वीच काही सेकंदांत मंगल कुंभारकर यांचे शिर तुटून एका बाजूला, तर शरीर मशिनच्या दुसऱ्या बाजूला फेकले गेले. मंगल यांचा झालेला करुण अंत पाहून मुलासह सर्वच सुन्न झाले. त्याही अवस्थेत त्यांना तातडीने जेजुरी येथील ग््राामीण रुग्णालय येथे उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
अशाच पद्धतीने दुसरी महिला जखमी
या घटनेच्या काही वेळापूर्वी वनपुरी (ता. पुरंदर)मध्येही अशीच घटना घडली. त्यात मळणी करणाऱ्या मशिनमध्ये अडकून चंद्रभागा मारुती कुंभारकर या जखमी झाल्या. त्यांच्या डोक्याचे स्कार्फ मशिनमध्ये अडकले. मात्र, त्यांनी ते तातडीने सोडवले. यात डोक्याचे केस उपटले गेले आणि त्या बाजूला फेकल्या गेल्याने थोडक्यात बचावल्या. त्यांनतर त्यांना तातडीने सासवड येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जखमी आईला सोडून मुलगा माळशिरसला
यापूर्वी जखमी झालेल्या चंद्रभागा कुंभारकर यांचा मुलगा दत्तात्रय कुंभारकर हे वनपुरी ग््राामपंचायतीच्या रुग्णवाहिकेवर चालक आहेत. ते आपल्या आईला उपचारासाठी घेऊन रुग्णालयात होते. दुसरीकडे मंगल कुंभारकर यांच्या अपघातानंतर माळशिरसमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. त्यामुळे वनपुरीची रुग्णवाहिका बोलावून घेण्यात आली. याची माहिती मिळताच आईवर उपचार सुरू असताना दत्तात्रय हे तातडीने रुग्णवाहिका घेऊन माळशिरसमध्ये दाखल झाले. तेथून मंगल कुंभारकर यांचे मृत शरीर रुग्णवाहिकेत घेऊन जेजुरी ग््राामीण रुगालयात पोहोचले. त्यानंतर रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.