

बोईसर : पालघर तालुक्यातील नवापूर ग्रामपंचायतीतील ग्रामसेवकाला कृषी पर्यटन केंद्रासाठी आवश्यक असलेला ना-हरकत दाखला देण्याच्या बदल्यात लाच मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
ग्रामसेवक राजेंद्र पंढरीनाथ संखे यांनी संबंधित तक्रारदाराकडे वीस हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर सापळा रचण्यात आला. सापळा यशस्वी ठरवत लाच स्वीकारताना ग्रामसेवक संखे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईमुळे ग्रामपंचायत प्रशासनात खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संबंधित ग्रामसेवकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून पुढील तपास करण्यात येत आहे. शासकीय कामासाठी लाच मागण्याचे प्रकार सातत्याने समोर येत असून प्रशासनाच्या प्रतिमेला यामुळे तडा जात असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.