

पुणे: भव्य उत्सव मंडपाची उभारणी, विद्युत रोषणाई अन् फुलांनी सजविलेले मंदिर अन् धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असे चैतन्यपूर्ण वातावरण नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिरांमध्ये रंगले असून, उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे.
सोमवारी (दि.22) सकाळी मंदिरांमध्ये विधिवत आणि पारंपरिक पद्धतीने घटस्थापना होणार असून, त्यानंतर भाविकांना दिवसभर दर्शन घेता येणार आहे. या निमित्ताने मंदिरांमध्ये धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमही रंगणार आहेत, त्याचेही नियोजन पूर्ण झाले. देवीच्या नामघोषाने मंदिर परिसर दुमदुमणार आहे. (Latest Pune News)
दरवर्षीप्रमाणे यंदाही नवत्रोत्सवानिमित्त शहर आणि उपनगरातील मंदिरांमध्ये जोमाने तयारी करण्यात आली आहे. विद्युत रोषणाई, रंगबिरंगी पताक्यांची सजावट, फुलांचे तोरण...अशी आकर्षक सजावटीने मंदिर परिसराला वेगळेच रूप प्राप्त झाले आहे.
सोमवारी (दि.22) सनई-चौघड्यांचे मंजूळ स्वर, प्रवेशद्वारात रांगोळीच्या पायघड्या, पारंपरिक वाद्यांच्या गजरात काही ठिकाणी मिरवणूक काढली जाणार आहे. तर मंदिरांमध्ये सकाळी विधिवत पद्धतीने घटस्थापना होणार आहे. पदाधिकारी आणि विश्वस्त या वेळी उपस्थित राहणार आहेत. भाविकांना दिवसभर मंदिरांमध्ये दर्शन घेता येणार असून, महाप्रसादाचा लाभही घेता येईल.
पहिल्या माळेला आदिशक्तीचा जागर होणार असून, उत्सवाच्या दहाही दिवस मंदिरांमध्ये कार्यक्रमांची रेलचेल असेल. नवरात्रोत्सवानिमित्त सगळीकडे आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पुणे-सातारा रस्त्यावरील पद्मावती देवी, तळजाईमाता देवस्थान आणि कर्वेनगर येथील वनदेवी मंदिरा मध्येही देवीचा जागर होणार आहे.
चतु:शृंगी मंदिर देवस्थान (सेनापती बापट रस्ता)
सोमवारी (दि.22) सकाळी साडेआठ वाजता मंदिर व्यवस्थापक विश्वस्त रवींद्र अनगळ यांच्या हस्ते घटस्थापना होईल. यानंतर अभिषेक, रुद्राभिषेक, महावस्त्र अर्पण आणि महापूजा करण्यात येणार आहे. या सर्व पूजेचे पौरोहित्य श्रीराम नारायण कानडे गुरुजी करणार आहेत. मंदिरात रोज सकाळी दहा आणि रात्री आठ वाजता महाआरती होईल. या वेळी शंखनाद पथकाचा गजर भाविकांना ऐकायला मिळेल. गणपती मंदिरात रोज भजन, कीर्तन, प्रवचनांचे आयोजन केले आहे. तसेच, श्रीसूक्त ललितासहस्त्रनाम, महिषासुर मर्दिनी स्त्रोत, वेदपठण असे धार्मिक कार्यक्रमही होतील.
ग्रामदैवता तांबडी जोगेश्वरी मंदिर
मंदिरामध्ये विधिवत आणि पारंपरिक पद्धतीने सोमवारी (दि.22) पहाटे साडेपाच वाजता घटस्थापना होणार आहे. तत्पूर्वी अभिषेक होणार आहे. त्यानंतर भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर सकाळी सहा ते रात्री बारा या वेळेत खुले राहणार आहे. मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी दिवसभर खुले राहणार असून, मंदिरात खास सजावटही करण्यात आली आहे.
भवानी देवी मंदिर (भवानी पेठ)
पारंपरिक आणि विधिवत पद्धतीने मंदिराच्या विश्वस्तांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. सकाळी सहा ते नऊ महारुद्राभिषेक महापूजा, नऊ वाजता तुकाराम दैठणकर यांचे सनईवादन होणार आहे तर सकाळी अकरा वाजता घटस्थापना होईल. आर्ट ऑफ लिव्हिंगचे सत्संग हे सायंकाळी साडेपाच ते रात्री सात या वेळेत असेल. तर चिन्मय देशपांडे यांचे कीर्तन होईल. उत्सवात रोज भजन-कीर्तनाचे कार्यक्रम, भक्तिगीतांचे कार्यक्रम, प्रवचन असे विविध कार्यक्रम रंगणार आहेत.
काळी जोगेश्वरी मंदिर (बुधवार पेठ)
सकाळी पारंपरिक आणि विधिवत पद्धतीने घटस्थापना होणार आहे. रोज सकाळी षोड्शोपचार पूजा, सप्तशती पाठ, श्रीसूक्त पठण, जोगवा, नवचंडी होम असे वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम होतील. तर रोज सकाळी नऊ वाजता आणि रात्री आठ वाजता आरती संपन्न होईल. यानिमित्ताने मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
पिवळी जोगेश्वरी मंदिर (शुक्रवार पेठ)
सोमवारी (दि. 22) मंदिरात विधिवत पद्धतीने सकाळी साडेनऊ वाजता दिनेश कुलकर्णी यांच्या हस्ते घटस्थापना होईल. प्रमोद तरडे यांचे नऊ दिवस सप्तशती पाठ होतील. श्रीसूक्त पठण, भजन-कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम होतील. भाविकांना मंदिरात दिवसभर दर्शनही घेता येणार आहे.