

पाथर्डी : जुन्या बसस्थानकाच्या दोन्हीही प्रवेशद्वाराजवळील राष्ट्रीय महामार्गाच्या गटारीवर दोन मोठे खड्डे पडले असून, हे खड्डे अजूनही या विभागाने न बुजवल्याने या खड्ड्यांत चारचाकी वाहने जाऊन वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. (Latest Ahilyanagar News)
नवरात्रोत्सव सुरू होण्यापूर्वीच हे खड्डे बुजवले जातील, असे आश्वासन नवरात्र महोत्सवासंदर्भात मोहटादेवी गडावर झालेल्या आढावा बैठकीत या विभागाशी संबंधित अधिकार्यांनी दिले होते. मात्र, अद्यापही या कामाला मुहूर्त न लागल्याने एक आठवड्यापूर्वी एका बसचे चाक या खड्ड्यात जाऊन गाडीचे मोठे नुकसान झाले होते.
दुसरा प्रकार बुधवारी (दि. 17) रात्री होऊन एका एसटीचे चाक कोरडगाव रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यात जाऊन बसचे नुकसान झाले. त्यामुळे विनाकारण प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. जुन्या बसस्थानकाच्या तीनपैकी दोन प्रवेशद्वारावर दोन मोठे खड्डे पडले असून, हे खड्डे बुजवावेत अशी मागणी अनेकवेळा प्रवाशांनी करूनही हे काम अद्यापपर्यंत करण्यात आलेले नाही.
ज्या मार्गावर हे खड्डे आहेत त्या दोन्हीही मार्गावर दिवसरात्र मोठी वर्दळ असून पाऊस सुरु झाला की या खड्ड्यावरून पाणी जात असल्याने अनेक दुचाकी व चारचाकी वाहन चालवणार्या चालकांना या खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने अपघात होत आहे.
या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी अजित चेमटे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.