पुणे: कोणी घट खरेदी करीत होते, तर कोणी फुले, कोणी पूजेच्या साहित्याच्या खरेदीला महत्त्व दिले, तर कोणी हळदी-कुंकू कार्यक्रमासाठी वाण खरेदी करण्याला प्राधान्य दिले. नवरात्रोत्सवाला सोमवारपासून (दि. 22) सुरुवात होणार असल्याने उत्सवाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच रविवारी (दि. 21) पुणेकरांनी खरेदीचे निमित्त साधले.
उत्सवाच्या खरेदीनिमित्त रविवार पेठेतील बोहरी आळी, मंडई, लक्ष्मी रस्ता, तुळशीबागसह ठिकठिकाणच्या बाजारपेठांमध्ये लगबग पाहायला मिळाली. सुटीचा दिवस असल्याने अनेकांनी खरेदीवर भर दिला आणि त्यामुळेच मंडई, रविवार पेठेत गर्दी झाली. पाच फळे, नारळ, पूजासाहित्य, घट, वेणी, फुले, हळदी-कुंकू, रांगोळी आदी विविध साहित्यांच्या खरेदीसाठी महिला-युवतींची लगबग पाहायला मिळाली.
नवरात्रोत्सवाच्या आनंदीपर्वाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. त्यानिमित्त उत्सवासाठी पूजासाहित्याची खरेदी झालीच पाहिजे. यामुळेच पुणेकरांनी रविवारी म्हणजेच सुटीच्या दिवशी खरेदीवर भर दिला. सायंकाळी चारनंतर बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी झाली. रविवार पेठेतील बोहरी आळीमध्ये सजावटीच्या साहित्याच्या खरेदीसाठी अनेकांनी गर्दी केली. नवरात्रोत्सवात महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या घट खरेदीसाठी कुंभारवाड्यातही लगबग दिसून आली.
तसेच मंडईत अगरबत्ती, हळदी-कुंकू, कापूर, वात अशा पूजासाहित्याच्या खरेदीलाही अनेकांनी भर दिला. घटस्थापनेसाठी लागणारी मंडपी, हळदी-कुंकू, देवीचे वस्त्र यासह घट, अखंड ज्योत तेवत ठेवण्यासाठी दिव्यांसह काळ्या मातीलाही मोठी मागणी होती. खरेदीसाठी गर्दी झाल्याने काही ठिकाणी वाहतूक कोंडीही झाली.
दहाही दिवसांच्या रंगानुसार साड्यांची खरेदी
नवरात्रोत्सवाच्या दहाही दिवस ठरलेल्या रंगानुसार महिला-युवती साड्या परिधान करतात. त्यानुसार महिला-युवतींनी साड्या आणि दागिन्यांची खरेदी केली. नवरात्रोत्सवातील प्रत्येक दिवशी ठरलेल्या रंगांप्रमाणे साड्यांची आणि त्याला शोभणाऱ्या दागिन्यांच्या खरेदीला महिला-युवतींनी प्राधान्य दिले. तुळशीबाग आणि लक्ष्मी रस्त्यावरील दालनांमध्ये कपडे आणि दागिने खरेदीचा उत्साह पाहायला मिळाला.