

पुणे /धायरी: मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवले पूल परिसरात मंगळवारी मध्यरात्री भरधाव सिमेंट मिक्सर उलटून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. रामेश्वर मच्छिंद भोगले (वय ३१, सध्या रा. वाघजाईनगर, कात्रज, मूळ रा. सांगवी, हाजीपूर, जि. बीड) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
याप्रकरणी सिमेंट मिक्सरचालकाविरुद्ध नऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गोरख लक्ष्मण रनसुरे (वय ५०, रा. काळभोर बिल्डिंग, लाेणी रेल्वेस्थानकाजवळ, लोणी काळभोर) असे मिक्सरचालकाचे नाव असून, तो देखील किरकोळ जखमी झाला असल्याचे नऱ्हे पोलिसांनी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ईश्वर चव्हाण यांनी सांगितले.
पोलिसांच्या माहितीनुसार, बाह्यवळण मार्गावरील नवले पूल परिसरातून सिमेंट मिक्सर बुधवारी (१० जून) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास मुंबईकडे निघाला होता. तेथील वळणावर मिक्सरचालकाचे नियंत्रण सुटले आणि १६ चाकी मिक्सर उलटला. त्या वेळी तेथून निघालेले दुचाकीस्वार रामेश्वर भोगले हे मिक्सरच्या चाकाखाली सापडले. अपघातात दुचाकीस्वार भोगले गंभीर जखमी झाले. सिमेंट मिक्सर उलटल्यानंतर चालक रनसुरे याच्या डोक्याला दुखापत झाली.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातात गंभीर जखमी झालेले दुचाकीस्वार भोगले, मिक्सरचालक रनसुरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच भोगले यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. अपघातानंतर काही काळ बाह्यवळण मार्गावरील मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त सिमेंट मिक्सर क्रेनच्या साहायाने बाजूला काढून वाहतूक पूर्ववत केली.
दरम्यान, बाह्यवळण मार्गावर नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल भागात भरधाव अवजड वाहनांचे ब्रेक निकामी होऊन गंभीर अपघात घडले आहेत. नवले पूल परिसरात झालेल्या गंभीर अपघातांची दखल घेऊन वाहतूक पोलीस, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिकेने एकत्र येऊन या भागातील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या होत्या. नवले पूल परिसरात झालेल्या अपघातांत अनेक बळी गेले आहेत. नवले पुलावर गेल्या वर्षी अपघातात आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला.