

पुणे: “सिंहस्थ कुंभमेळ्याची धार्मिक परंपरा, नाशिक-त्र्यंबकेश्वरचे सांस्कृतिक महत्त्व आणि गोदावरी नदीचे पावित्र्य अशा विविध गोष्टींचे प्रतिबिंब उमटविणारे मी तयार केलेले बोधचिन्ह आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी अधिकृतरीत्या निवडले जाणे, ही खूप मोठी गोष्ट आहे. हा क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय असून, माझ्या कलेचा हा सर्वांत मोठा सन्मान आहे,” अशा भावना पुण्यातील युवा डिझायनर सुमित काटे यांनी व्यक्त केल्या.
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील बोधचिन्ह अर्थात लोगो रचना स्पर्धेत सुमित काटे यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून, त्यांचे हे बोधचिन्ह नाशिक -त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी अधिकृत बोधचिन्ह म्हणून निवडले गेले आहे.
बुधवारी (दि. 13) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने आणि असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडियाच्या सहकार्याने ही बोधचिन्ह रचना स्पर्धा झाली. मूळचे कोल्हापूरचे असलेले सुमित काटे यांचे शिक्षण कलानिकेतन महाविद्यालयात झाले.
सध्या ते पुण्यात वास्तव्यास असून, एका डिजिटल जाहिरात संस्थेत व्हिज्युलायझर म्हणून कार्यरत आहेत. अप्लाईड आर्टचे शिक्षण घेतलेल्या सुमित यांनी गेली आठ ते नऊ वर्षे डिझाईन क्षेत्रात काम करताना मिळालेल्या अनुभवाच्या आधारे हे बोधचिन्ह साकारले आहे.
सुमित काटे म्हणाले, “नाशिक येथील कुंभमेळ्यासाठी बोधचिन्ह स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर मी अर्ज भरला आणि काम सुरू केले. बोधचिन्हासाठी दिलेल्या संकल्पनेवर आधारित मी बोधचिन्ह तयार केला.
विशेष म्हणजे अवघ्या वीस दिवसांत मी हे बोधचिन्ह तयार केले. बुधवारी बोधचिन्हाचे विशेष कार्यक्रमात अनावरण झाले. त्यानंतर ते सी-लिंकवर झळकले, तो क्षण अभिमानाचा होता. कुटुंबातूनच मला कलेचा वारसा लाभला. त्यामुळे या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला.”
...असे आहे बोधचिन्हाचे वैशिष्ट्य
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पवित्र भावनेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या बोधचिन्हात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक प्रतीकांचा समावेश करण्यात आला आहे. भगवान शिवशंकर यांचा त्रिशूळ दैवी शक्तीचे प्रतीक दर्शवतो, नाशिक येथील काळाराम मंदिराचा कळस आणि महिरप आध्यात्मिक वारशाचे दर्शन घडवते, वैष्णव ध्वज असीम भक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक आहे, शिवलिंगाच्या आकारात दर्शविण्यात आलेली गोदावरी नदी पवित्र स्नान आणि अध्यात्मिक शुद्धतेचे महत्त्व अधोरेखित करते. श्रद्धा, परंपरा आणि आध्यात्मिक एकता यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न या बोधचिन्हातून केला आहे, असे सुमित काटे यांनी सांगितले.