

सासवड: प. पू. श्री नारायण महाराज (अण्णा) यांच्या कृपाशीर्वादाने आणि प. पू. टेंबे स्वामी महाराज यांच्या आधिपत्याखाली बुधवारी दि. २९ जुलै रोजी श्रीक्षेत्र नारायणपूर (ता. पुरंदर) येथे गुरुपौर्णिमेनिमित्त एकदिवसीय भव्य आध्यात्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि देवस्थान समितीने व्यापक नियोजन केले असून, त्यासाठी बुधवारी (दि. २२) समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले.
बैठकीत भाविकांच्या सुरक्षिततेसह पाणीपुरवठा, आरोग्यसेवा, वाहतूक नियंत्रण, विद्युतव्यवस्था, स्वच्छता, कायदा व सुव्यवस्था तसेच आपत्ती व्यवस्थापनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रभारी गटविकास अधिकारी अविनाश थोरात यांनी सांगितले की, विविध विभागांचे अधिकारी परस्परसमन्वयाने कार्यरत राहणार आहेत. सासवड नगरपालिकेमार्फत अग्निशमन दलाची गाडी, पिण्याच्या पाण्याचे टँकर, मोबाईल शौचालये तसेच फॉगिंग यंत्रणेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
बैठकीत सोहळ्याच्या सर्व तयारीचा आढावा प. पू. टेंबे स्वामी महाराज यांनी घेतला. या वेळी सभापती अमित झेंडे, जिल्हा परिषद सदस्य हरीभाऊ लोळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विक्रम काळे, सासवड नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी मोहन चव्हाण, ओमकार शिंदे, आरोग्य विभागाचे अधिकारी, दादा भुजबळ, सरपंच प्रदीप बोरकर, चंद्रकांत बोरकर, बाळासाहेब गायकवाड तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
रात्रीपर्यंत कार्यक्रमांची रेलचेल
गुरुपौर्णिमा सोहळ्याची सुरुवात पहाटे ४ ते ६ या वेळेत श्री दत्त मंदिरातील एकमुखी व त्रिमुखी दत्तमूर्ती तसेच श्री नारायणेश्वर (महादेव) मंदिरातील रुद्राभिषेकाने होणार आहे. सकाळी ६ ते ७ या वेळेत श्री नारायण महाराज समाधिस्थळी रुद्राभिषेक, तर सकाळी ६ ते ८ या वेळेत काकड आरती होईल. सकाळी ८.३० वाजता आरती, त्यानंतर सकाळी ९ ते १०.३० या वेळेत होमहवन, सकाळी ११ वाजता दीपप्रज्वलन व मान्यवरांचे स्वागत, ११.३० वाजता व्यासपूजन, तर दुपारी १२ वाजता सद्गुरू श्री अण्णा महाराजांच्या पादुकांचे भाविकांच्या हस्ते पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर मान्यवरांचे मनोगत, श्री ढगे स्वामी महाराजांचे प्रवचन व मार्गदर्शन, आरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.
सुरक्षा व वाहतूक व्यवस्थेवर विशेष भर
नियोजन बैठक पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. गुरुपौर्णिमेनिमित्त मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, पार्किंग, आपत्कालीन प्रतिसाद आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.