नारायणगाव : नारायणगावची ओळख असलेल्या राष्ट्रपतिपदक विजेत्या विठाबाई भाऊ मांग तमाशापंढरीत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात तमाशाच्या बार्या ठरविण्यात आल्या. मंगळवारी (दि. 9) बुकिंगमधून चार ते पाच कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती फडमालक आविष्कार मुळे यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना सांगितले.
तमाशापंढरीत नामांकित तमाशा फडमालकांच्या 36 राहुट्या लागल्या आहेत. अनेक तमाशारसिक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नारायणगावात येऊन गावच्या जत्रेसाठी तमाशाचे बुकिंग करतात. बारामती, सातारा, सांगली, संगमनेर, अहमदनगर, पारनेर, अकोले, खेड, शेवगाव, फलटण आदी ठिकाणचे गावकरी मंगळवारी नारायणगावच्या तमाशापंढरीत तमाशाची बारी ठरवायला आले होते. मोठ्या फडमालकांच्या तमाशाची सुपारी 3 लाख रुपयांपर्यंत बुक झाली, तर छोट्या तमाशाची बारी 1 लाख रुपयांपर्यंत बुक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, फडमालकांकडे मे महिनाअखेरपर्यंत अवघ्या आठ ते दहा तारखा शिल्लक असल्याचे दिसून येत होते. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सायंकाळी सात वाजेपर्यंत सुमारे 170 करार झाले असून, 4 ते 5 कोटींची उलाढाल झाली. नामांकित तमाशा फडमालकांचे मे महिन्याच्या अखेरपर्यंत तमाशाचे संपूर्ण बुकिंग झाले आहे.
लोकसभेच्या निवडणुका तमाशा कलावंतांच्या मुळावर आलेल्या दिसून येत आहे. प्रशासनाने तमाशा कलावंतांना सायंकाळी सात ते मध्यरात्री दहा वाजेपर्यंत तमाशा चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे. परंतु, ग्रामीण भागात रात्री दहा वाजेनंतर तमाशा सुरू होत असल्याने पुढील दोन तासांत गणगवळण, बतावणी, रंगबाजी व वगनाट्य कसे दाखवायचे? असा प्रश्न तमाशा कलावंतांपुढे पडला आहे. त्यामुळे दोन तास तमाशा चालू ठेवण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे, अशी मागणी मोहित नारायणगावकर यांनी केली आहे.
बदलत्या डिजिटल काळाबरोबर तमाशातील गाण्यांची व नृत्याची तुलना नृत्यांगना गौतमी पाटील हिच्याबरोबर केली जात आहे. आजही तमाशा कलावंतांना मद्यपी व धांगडधिंगा करणार्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने कायमस्वरूपी अनुदान द्यावे.
– मयूर महाजन, आनंद लोकनाट्य तमाशा मंडळ, जळगाव
हेही वाचा