नारायणगाव बसस्थानक म्हणजे प्रवाशांना मनस्ताप

नारायणगाव बसस्थानक म्हणजे प्रवाशांना मनस्ताप
Published on
Updated on

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा :  'बहुजन हिताय बहुजन सुखाय' असं ब्रीदवाक्य असलेल्या एसटी महामंडळाच्या नारायणगाव आगाराचा कारभार ढेपाळलेला आहे. बसस्थानकांमधून गाड्या वेळेवर सुटत नसल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे एस.टी. महामंडळाने लाखो रुपये खर्च करून नारायणगावला सुसज्ज बसस्थानक बांधले आहे. या बसस्थानकामध्ये पुण्याहून आणि नाशिकहून येणार्‍या गाड्या थांबत असतात. या डेपोमधून इतरत्र महत्त्वाच्या गावांनादेखील बस जात असतात. मात्र, बस वेळेवर सुटत नसल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. पुण्याकडे जाणारी बस वेळेवर फलाटावर लागत नसल्यामुळे प्रवाशांना बसची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागत आहे.

खूप वेळानंतर बस फलाटावर लागल्यावर प्रवासी गर्दी करून बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात. या गर्दीचा फायदा घेऊन पाकीटमार किंवा भुरटे चोर खिशातील पाकीट अथवा गळ्यातील दागिने लंपास करण्याच्या घटना घडत आहेत. याच बसस्थानकामधून नारायणगाव – जुन्नर विनावाहक बसची स्वतंत्र व्यवस्था आहे. तिकीट घेऊनच प्रवाशांनी बसमध्ये बसण्याची तरतूद आहे. अनेक प्रवासी नंबरला एकाला उभे करतात व बाकीचे बसमध्ये जाऊन बसतात आणि जागा आरक्षित करतात. त्यामुळे प्रत्यक्षात तिकीट ज्यांनी काढले त्यांना बसमध्ये बसायला जागा मिळत नाही. 'आम्ही तिकीट काढून आलोय, तुमचं तिकीट काढणे बाकी आहे. तुम्ही उठा आम्हाला बसायला जागा द्या,' असं म्हटल्यावर या दोन प्रवाशांमध्ये भांडणं होताना दिसत आहे.

बसमध्ये बसणार्‍यांची संख्या आणि उभे राहणार्‍यांची संख्या यांची मर्यादा ठरलेली आहे; परंतु बसमध्ये अक्षरशः मेंढरांसारखे प्रवासी कोंबून बसवले जातात. याविषयी संबंधित अधिकार्‍यांना विचारणा केली असता, ते बोलण्यास नकार देतात. गेल्या काही महिन्यांपूर्वी म्हणजे साधारण मे-जून महिन्यामध्ये बसस्थानकामध्ये प्रवाशांना धुळीचा खूप त्रास होतोय म्हणून बसस्थानकाच्या परिसरात डांबरीकरण करून प्रवाशांची गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न केला गेला; परंतु हे काम व्यवस्थित न झाल्यामुळे प्रवाशांना होणारा धुळीचा त्रास कायम आहे.

बसस्थानकाच्या सुलभ शौचालयामध्ये अनेक वेळा पाण्याचा तपासच नसतो. महिलांकडून प्रसाधनगृहात गेल्यावर पाच रुपये सक्तीने वसूल केले जातात. महिला प्रवाशांकडून पैसे घेऊ नयेत, अशी मागणी मनसेचे जिल्हाप्रमुख मकरंद पाटील यांनी केलेली असून, याबाबतचा फलक त्या ठिकाणी लावलेला आहे. नारायणगाव बसस्थानकाचा कारभार पूर्णपणे ढेपाळला असून, वरिष्ठ अधिकार्‍यांनी या डेपोची पाहणी करून दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करून प्रवाशांना योग्य पद्धतीने बसमधून प्रवास करता येईल याबाबतची दक्षता घ्यायला हवी.

दरम्यान या संदर्भात नारायणगाव बस डेपोचे आगारप्रमुख वसंत आरगडे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून याबाबतची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, ते पुण्याला बैठकीला गेले असल्याने याबाबतची त्यांची अधिकृत प्रतिक्रिया समजू शकली नाही. दरम्यान नारायणगाव बसस्थानकामधून निर्धारित वेळेमध्ये बस सोडल्या जाव्यात, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मकरंद पाटील यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news