

कात्रज(पुणे); पुढारी वृत्तसेवा : महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी ओढे-नाले,कल्व्हर्ट, पावसाळी व सांडपाणी वाहिन्यांची सफाई केली जाते. मात्र, यंदा मे महिन्याच्या अखेरपर्यंत कात्रज परिसरात ही कामे अर्धवट आहेत. महापालिकेत नव्याने समाविष्ट केलेल्या परिसरातील गावांच्या नालेसफाईच्या निविदा अद्यापही पूर्ण न झाल्याने हे काम सुरू तरी कधी होणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पावसाळ्यापूर्वी मे महिन्याच्या अखेरपर्यंत ओढे, नाल्यांच्या साफसफाईची कामे पूर्ण होणे अपेक्षित होते.
मात्र, परिसरातील अनेक कामे अर्ध्यावर रखडल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. प्रशासनाकडून नाले व ओढ्यांची सफाई होते. मात्र, पावसाळी व सांडपाणी वाहिन्यांसह चेंबरची साफसफाई व्यवस्थित होत नसल्याने पहिल्याच पावसात पाणी तुंबते. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग 38 अंतर्गत 7 कि.मी. लांबीचे ओढे-नाले असून, 68 टक्के काम पूर्ण झाले आहे. यामध्ये के. के. मार्केट ते चिंतामणी पार्क, लेकटाऊन ते राजस सोसायटीपर्यंत काम पूर्ण झाले आहे. तसेच कल्व्हर्ट व पावसाळी चेंबर सफाईचे काम पूर्णत्वास आले असल्याचे कनिष्ठ अभियंता क्षीरसागर यांनी सांगितले.
गुजर-निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, जांभूळवाडी-कोळेवाडी भागांतून लहान-मोठे ओढे वाहतात. महापालिकेत नव्याने समाविष्ट केलेल्या या गावांतील नालेसफाईसाठी निविदा प्रक्रिया राबवणे गरजेचे होते. मात्र, मूलभूत सुविधेप्रमाणे पावसाळापूर्व कामातदेखील या गावांना डवलले जात आहे.
व्यंकोजी खोपडे,
माजी सरपंच, गुजर-निंबाळकरवाडी