

जळोची; पुढारी वृत्तसेवा: बारामती शहरातील माळावरची देवी मंदिर येथे नवरात्रीनिमित्त यात्रा भरली आहे. मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येत आहे, परंतु बारामती नगरपरिषदेने परिसरात शौचालय, स्नानाची सोय, पिण्याचे पाणी आदी सुविधा दिलेल्या नाहीत. त्यामुळे भाविकांची गैरसोय होत आहे. येथील यात्रेतून मोठी उलाढाल होते. परंतु, कोणत्याही सुविधा दिल्या जात नसल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली.
माळावरची देवी मंदिर परिसर सध्या भक्तांच्या गर्दीने फुलून गेला आहे. खेळणी, खाद्यपदार्थ विक्रेते, मनोरंजन, पाळणे, झोके यामुळे परिसरात शहरासह तालुक्यातील आबालवृद्धांची मोठी गर्दी होत आहे. परंतु, भाविकांना नगरपरिषदेने मूलभूत सुविधादेखील दिलेल्या नाहीत. पालखी सोहळा आल्यानंतर पालिकेकडून शहरात तात्पुरते शौचालय, स्नानाची सोय, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर आदी सोयी पुरवल्या जातात. परंतु, नवरात्रातील या मोठ्या यात्रेला मात्र कोणत्याही सोयीसुविधा दिल्या जात नाहीत, याबाबत भाविकांनी नाराजी व्यक्त केली.
कोणतीही व्यवस्था नसल्याने सध्या या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. साथीच्या आजारांची शक्यता निर्माण झाली आहे. परिसरातील देसाई इस्टेट, अंबिकानगर, गौतम बाग, जळोची गाव रस्ता, निरा डावा कालवा भराव आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. नगरपरिषदेने टँकरने पाणी पुरवावे व तात्पुरते शौचालय उभारावे, अशी मागणी भाविकांनी व स्थानिक नागरिकांनी केली आहे.
स्वीमर्स टँकची सामाजिक बांधिलकी
देवीच्या मंदिर परिसरातील भाविक व विक्रेते यांची गैरसोय होत असल्याने वीर सावरकर स्वीमर्स क्लबच्या वतीने नऊ दिवस 24 तास मोफत पिण्याचे पाणी व आंघोळीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे.