Pune Vehicle Vandalism: नाहक भुर्दंड; सांगा टोळधाड कशी रोखणार? दीड वर्षात 140 पेक्षा अधिक अशा घटना घडल्या

किरकोळ कारणातून एकमेकांवर खुनी हल्ला केला जात आहे, तर भाईला खुन्नस दिली म्हणून जिवे मारण्याचा प्रयत्न केला जात आहे
Pune Vehicle Vandalism
नाहक भुर्दंड; सांगा टोळधाड कशी रोखणार? दीड वर्षात 140 पेक्षा अधिक अशा घटना घडल्याFile Photo
Published on
Updated on

अशोक मोराळे

पुणे: शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला असला, तरी वाहन तोडफोड, जाळपोळ करणार्‍या शस्त्रधारी टोळक्यांना अंकुश लावण्यात मात्र पोलिस कमी पडत असल्याचे चित्र आहे. मागील दीड वर्षात शहरात 140 पेक्षा अधिक अशा घटना घडल्या आहेत.

किरकोळ कारणातून एकमेकांवर खुनी हल्ला केला जात आहे, तर भाईला खुन्नस दिली म्हणून जिवे मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. टोळीची दहशत निर्माण करण्यासाठी नागरिकांच्या वाहनांची बेफाम तोडफोड केली जातेय, तर कोणी नशेत बेधुंद होऊन वाहने फोडतोय. परंतु, त्यामध्ये पुणेकरांना नाहक भुर्दंड सोसावा लागतोय. त्यामुळे सांगा ही टोळधाड कशी रोखणार? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. (Latest Pune News)

Pune Vehicle Vandalism
Indore Pattern: पुण्यात कचरासंकलनासाठी राबविला जाणार ‘इंदूर पॅटर्न’

वाहने तोडफोडीत सराईत गुन्हेगारांचाही सहभाग लक्षणीय आहे. दोन दिवसांपूर्वी धनकवडीत वाहने फोडणारा रोहित आढाव हा सहकारनगर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे, तर फुरसुंगीत तोडफोड करणार्‍या आरोपींपैकी एक जण हडपसर पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहे. यापूर्वी त्याच्यावर वाहन तोडफोडीचा गुन्हा दाखल आहे.

असे असतानादेखील त्याने परत वाहने फोडली आहेत, तर अन्य एक जण राजगड पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल असून, सध्या तो जामिनावर बाहेर आहे. गुन्हेगार पोलिसांना न जुमानता गुन्हेगारी कृत्य करत आहेत. त्यामुळे स्थानिक गुंडावर पोलिसांचा वचक आहे की नाही, असा सवाल निर्माण झाला आहे.

Pune Vehicle Vandalism
Pune Water Supply Timing: पुणेकरांनो लक्ष द्या! 'या' परिसरातील पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल

मागील दीड वर्षात शहरातील विविध भागांत वाहन तोडफोड आणि जाळपोळीचे 140 पेक्षा अधिक गुन्हे पोलिस दफ्तरी दाखल आहेत. त्यामध्ये साडेतीनशेपेक्षा अधिक जणांचा आरोपी म्हणून समावेश आहे. यापैकी 142 जणांना पोलिसांनी अटकदेखील केली आहे.

अल्पवयीन मुलांचेदेखील तोडफोडीच्या गुन्ह्यात 30 ते 40 टक्के प्रमाण असल्याचे दिसून येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाहने फोडणार्‍या टोळक्यांवर पोलिसांनी यापूर्वी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यानुसार कारवाई केली आहे. तरीदेखील या टोळक्यांचा उपद्रव काही केल्याने थांबण्याचे नाव घेताना दिसून येत नाही.

नागरिकांमध्ये वाहने फोडणार्‍या शस्त्रधारी टोळक्यांमुळे दहशतीचे वातावरण आहे. टोळक्यांतील आरोपींना पकडल्यानंतर त्यांची खास गुन्हे शाखेकडून हजेरी घेतील जाते आहे. पुन्हा असे करणार नाही म्हणून त्यांच्याकडून वदवून घेतले जाते आहे; परंतु तरीदेखील वाहन तोडफोडीच्या घटना थांबण्याचे नाव घेताना दिसून येत नाहीत. धनकवडी परिसरात नागरिकांच्या वाहनांची तोडफोड करून दहशत माजवणार्‍या टोळीचा सहकारनगर पोलिसांनी अवघ्या 24 तासांत छडा लावला.

याप्रकरणी पोलिसांनी दोन तरुण आरोपींसह तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. आरोपी आखाड पार्टी करून वाढदिवस असलेल्या अल्पवयीन मुलाला भेटण्यास त्या परिसरात आले होते. मात्र, मित्राने भेटण्यास नकार दिल्याने आरोपींनी रागाने हे कृत्य केल्याचे पोलिसतपासात निष्पन्न झाले होतेे. ‘आम्ही धनकवडीचे भाई आहोत, आमच्या नादाला लागायचं नाही,’ असा आरडाओरडा करत बुधवारी (23 जुलै) मध्यरात्री 15 रिक्षा, दोन मोटार आणि एका व्हॅनची तोडफोड करण्यात आली होती. बुधवारी सायंकाळी एका अल्पवयीनाकडून विश्रांतवाडी भागात वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली होती. नागरिकांनी त्याला धरून चोप दिला होता.

कोंढव्यात दोन दिवसांपूर्वी एका किराणा दुकानात शिरून टोळक्याने हल्ला केला होता. खाद्यपदार्थांची पाकिटे फेकून दिली होती. दुकानासमोर लावलेली रिक्षाची काच फोडण्यात आली होती. भवानी पेठेतील मंजुळाबाई चाळीत टोळक्याने दहशत माजवून वाहनांची तोडफोड केली होती. गेल्या काही दिवसांत शहरात वाहनांची तोडफोड करून दहशत माजविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ओैंधमधील विधाते वस्ती परिसरात वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. सिंहगड रस्त्यावरील माणिकबागेत टोळक्याने 15 वाहनांची तोडफोड केली होती.

प्रमुख कारणे (वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या माहितीनुसार)

  • पूर्ववैमनस्य, वाढती व्यसनाधीनता,

  • स्वतःची दहशत निर्माण करून प्रतिस्पर्धी टोळीवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी

  • स्वतःआणि आपल्या टोळीची गुन्हेगारी ओळख निर्माण करण्यासाठी

  • चित्रपट, सोशल मीडिया, रॅप यातून होणारे गुन्हेगारीची उद्दात्तीकरण

  • परिसरातील भाई, दादा लोकांचे आकर्षण

  • इतर दुसरे चांगले काम करत येत नसल्यामुळे आलेले अपयश

  • गुन्हेगारी मार्गाने रात्रीत मोठे होण्याचे स्वप्न

  • पालकांचे दुर्लक्ष, व्यवस्थित संगोपनाचा अभाव

  • मानसिकदृष्या अपयशी, नशेच्या धुंतीत स्वतःला श्रेष्ठ समजणे आदी कारणांतून वाहन तोडफोड, जाळपोळीसारखे प्रकार आरोपी करतात

परिमंडल चार, पाचमध्ये सर्वाधिक प्रकार

शहर पोलिस आयुक्तालयातील परिमंडल चार आणि पाचच्या हद्दीत वाहने फोडल्याचे सर्वाधिक गुन्हे दाखल आहेत. येरवडा, विमानतळ, चतुःशृंगी, बाणेर, हडपसर, कोंढवा, वानवडी, बिबवेवाडी, लोणी काळभोर या पोलिस ठाण्यांची हद्द गुन्हेगारांच्या टार्गेटवर असल्याचे निदर्शनास येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news