

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भारतीय संरक्षण खात्यात काम करीत असल्याचे भासवून कंपनीतून तब्बल 46 कार बाहेर काढून त्या कारची परस्पर इतरांना विक्री केल्याचा प्रकार घडला. मिळालेली रक्कम कंपनीत जमा न करता कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडकी येथील सीएसडी डेपोचे प्रबंधक यांच्या नावाने दोन बनावट धनादेश तयार करूनदेखील फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी मोहन त्रिंबके यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी साई प्रविण नंजुन दप्पा (रा. धायरी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कात्रज बायपास रोडवरील ईशान्य ह्युंदाई मोटर्स येथे 13 मे 2021 ते 17 डिसेबर 2022 दरम्यान घडला. साई याला कंपनीने कार विक्रीबाबत काही अधिकार दिले होते. त्याने या अधिकारांचा गैरवापर केला. एकूण 46 ग्राहक हे भारतीय संरक्षण खात्यात काम करीत असल्याचे खोटे भासविले. ग्राहकांचे वाहन सोडण्याचे गेट पास बनवून त्यावर स्वत:ची सही करून कंपनीतील 46 कार बाहेर काढल्या.
त्या गाड्यांची खासगी व्यक्तींना परस्पर विक्री केली. ती रक्कम कंपनीत जमा न करता स्वत: स्वीकारून कंपनीची फसवणूक केली. त्यानंतर त्याने खडकी येथील सी एस डी डेपोचे क्षेत्रीय प्रबंधक यांच्या नावाने दोन बनावट चेक तयार करून ते खरे आहेत, असे भासवून ते कंपनीत जमा केले. त्यानंतर तो फसवणूक करून त्याने पोबारा केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.