

सुवर्णा चव्हाण :
पुणे : पूर्वीच्या काळी गुरूंसमोर बसून प्रत्यक्ष संगीत शिक्षण घेण्याची परंपरा होती. ही आजही कायम आहे. परंतु काळाप्रमाणे बदलत आता ऑनलाइन पद्धतीने गुरूंकडून संगीत शिक्षण घेतले जात आहेत. तेही सातासमुद्रापलीकडे. कारण आता भारतातून थेट संगीत गुरू परदेशात राहणार्या शिष्यांसाठी ऑनलाइन वर्ग घेत असून, परदेशातील अनेक भारतीय आपल्या गुरूंकडून ऑनलाइन पद्धतीने संगीत शिक्षण घेत आहेत. अमेरिका असो वा कॅनडा…अशा विविध देशांत राहणारे भारतीय आता सातासमुद्रापलीकडे राहूनसुद्धा संगीत विशारद बनले आहेत, तर अनेकांनी संगीतात प्रावीण्य मिळवले आहे.
सध्याला परदेशात राहणारे शेकडो भारतीय नागरिक संगीताचे धडे गिरवत आहेत. पुण्यातील अनेक संस्थांसह गुरूंकडून संगीत शिक्षण दिले जात आहे. विविध अॅपद्वारे लाइव्ह पद्धतीने त्यांच्यासाठी ऑनलाइन वर्ग घेतले जात आहेत. अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, फ—ान्स, दक्षिण आफि—का, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आदी देशांतील नागरिक संगीत शिक्षण घेत आहेत. खासकरून शास्त्रीय आणि सुगम संगीत शिकण्याकडे अधिक कल आहे.
शास्त्रीय संगीतातील गायकीतील विविध पैलू असो वा त्यातील बारकावे…असे सारेकाही त्यांना शिकवले जात आहे. बुधवारी (दि.21) साजरा होणार्या जागतिक संगीत दिनानिमित्त दै. 'पुढारी'ने याबद्दल जाणून घेतले. गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य पं. प्रमोद मराठे म्हणाले, नोकरीनिमित्त आणि व्यवसायानिमित्त विविध देशांमध्ये राहणारे अनेक भारतीय नागरिक संगीत शिक्षणाकडे वळले आहेत. विशेष म्हणजे ऑनलाइन वर्गाद्वारे ते संगीत शिकत असून, आपल्या मातीशी रुजलेले अस्सल भारतीय संगीत शिकण्याकडे त्यांचा रस वाढला आहे. परदेशात राहणार्यांना आम्ही संगीत शिक्षण देत आहोत. ऑनलाइन वर्गांना चांगला प्रतिसाद आहे.
परदेशात राहणार्या भारतीय नागरिकांचा संगीत शिकणाकडे कल वाढला आहे. कोरोना काळानंतर तर त्याचे प्रमाण वाढले आहे. अमेरिका, युके, ऑस्ट्रेलिया येथे राहणार्या नागरिकांचा या वर्गांना चांगला प्रतिसाद असून, शास्त्रीय संगीतासह सुगम संगीतही ते शिकत आहेत. कामानिमित्त हे नागरिक परदेशात राहत असल्याने भारतीय मातीशी रुजलेले संगीत असो वा संस्कृती…सर्वकाही
ते मिस करतात. म्हणूनच संगीताशी बंध जोडण्यासाठी ते संगीत शिक्षणाकडे वळले आहेत. – शिल्पा पुणतांबेकर,
सहकार्यवाह, पुणे भारत गायन समाज
भारतातील विविध राज्यांतील नागरिकही वेळ काढून संगीत शिक्षण घेत आहे. महाराष्ट्रातील विविध संगीत संस्थांकडून त्यांच्यासाठीही ऑनलाइन वर्ग घेतले जात आहेत. या वर्गात राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात, मध्य प्रदेश, गोवा आदी राज्यांतील नागरिकांचा प्रतिसाद आहे. 18 ते 40 वयोगटातील तरुणांचा संगीत शिक्षणाकडे कल आहे.