

पुणे; पुढारी वृत्तसेवा: अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे करणार्या इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील एका माध्यमिक विद्यालयातील शिक्षकाला पोलिस कोठडी संपल्यानंतर न्यायालयीन कोठडीत तुरुंगात पाठवण्यात आले आहे. 13 जून ते 6 ऑक्टोबरच्या दरम्यान शाळेतील 11 अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे केल्याची ही घटना घडली होती.
दरम्यान, संबंधित शिक्षकावर वालचंदनगर पोलिसात 22 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल झाला होता. या शिक्षकाला 29 ऑक्टोबर रोजी अटक झाल्यानंतर बारामती सत्र न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. दरम्यान, यातील एका पीडित मुलीने आपल्याला न्याय मिळावा म्हणून 1 नोव्हेंबर रोजी पुणे येथील बाल कल्याण समितीकडे लेखी तक्रार केली आहे.
सदर घटनेबाबत ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीला प्रचंड चर्चा सुरू होती. त्या अनुषंगाने दै.'पुढारी'ने याबाबत सर्वप्रथम वृत्त प्रसिद्ध केले होते. दै.'पुढारी'मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच संबंधित शिक्षकावर वालचंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे : इंग्रजी विषय शिकवत असलेल्या एका शिक्षकाने गेल्या चार महिन्यांच्या काळात शाळेतील सहावी इयत्तेत शिकणार्या 11 अल्प अल्पवयीन मुलींशी अश्लील चाळे केले होते. सुरवातीला या मुलींनी भीतीपोटी वाच्यता केली नाही.
मात्र, संबंधित विकृत मनोवृत्तीच्या नराधम शिक्षकाने जास्तीच चाळे सुरू केले. अखेर यापैकी एका पीडित मुलीने 4 ऑक्टोबर रोजी शाळेच्या प्राचार्यांकडे तक्रार केली. त्यावर चौकशी करून शाळा व्यवस्थापनाने त्या शिक्षकास सक्तीच्या रजेवर पाठवले. मात्र, 6 ऑक्टोबर रोजी आणखी दहा मुलींनी संबंधित शिक्षकाबाबत तक्रार केली. घटनेचे गांभीर्य लक्षात येताच या नराधम शिक्षकाने त्याच दिवशी स्वेच्छानिवृत्तीकरिता शाळेकडे अर्ज दाखल केला होता. दरम्यान, या घटनेबाबत संबंधित प्राचार्यांनी 22 ऑक्टोबर रोजी पोलिसात गुन्हा दाखल केला.