

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पाणीपुरवठा करणार्या कालव्यात अज्ञात व्यक्तीकडून मृत जनावरे (डुक्कर) टाकण्याचे प्रमाण वाढल्याने आणि याचा परिणाम थेट पाणीपुरवठ्यावर होत असल्याने कात्रीत सापडलेल्या महापालिका प्रशासनाने आता पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी लवकरच पोलिस प्रशासनाला पालिकेकडून पत्र दिले जाणार आहे. अपुरा पाणीपुरवठा, कालव्यामध्ये आढळणारी मृत जनावरे (डुक्कर), पाण्यामध्ये वारंवार सापडणार्या अळ्या, यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी नुकतेच भेकराईनगर चौकात रास्ता रोको आंदोलन केले.
या आंदोलनात भेकराईनगर, ढमाळवाडी, पापडेवस्ती, तुकाईदर्शन, गंगानगर, गणेशनगर, पॉवरहाऊस, फुरसुंगी, मंतरवाडी येथील नागरिक सहभागी झाले होते. या मोर्चात महिला हंडा घेऊन सहभागी झाल्या होत्या. यावेळी आंदोलकांनी महापालिका प्रशासन आणि महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरण (एमजीपी) यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी नागरिकांनी बंद नळाद्वारे स्वच्छ व शुद्ध पाण्याचा सुरळीतपणे पुरवठा करण्याची मागणी केली.
पाणीप्रश्नासंदर्भात लवकरच ग्रामस्थ, पालिका अधिकारी, एमजीपीचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊ, असे आश्वासन पालिका अधिकार्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, गंगानगर जवळ मागील काही दिवसांपासून सातत्याने कालव्यात मृत डुकरे आढळून येत आहेत. तीन ते चार दिवसांत कालव्यामध्ये तब्बल 40 मृत डुकरे आढळून आली आहेत.
या दुषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होईल. त्यामुळे महापालिकेने कालव्यातील पाणी नागरिकांसाठी सोडणे बंद केले आहे. दुसरीकडे महापालिकेतून गावे वगळण्याचा निर्णय झाल्याने पाणी बंद केले जात असल्याचा जावई शोध काही लावत आहेत. परिणामी, कात्रीत सापडलेल्या महापालिकेने मृत डुकरे टाकणार्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी लवकरच पोलिस प्रशासनाला पत्र देण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.