

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरातील भटक्या कुत्र्यांच्या गणनेस अखेर चार वर्षांनंतर मुहूर्त मिळाला आहे. या कामासाठी महापालिकेने एका संस्थेची नेमणूक केली आहे. नवीन वर्षात काम सुरू करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. सध्या शहरात तीन लाखांपेक्षा अधिक भटकी कुत्री असल्याचे सामाजिक संस्थांकडून सांगितले जाते. त्यात समाविष्ट गावांमधील भटक्या कुत्र्यांच्याही समावेश झाल्याने ही संख्या पाच लाखांच्या घरात पोहोचली आहे. या कुत्र्यांचा सर्वाधिक त्रास रात्री उशिरा कामावरून घरी जाणार्या आणि पहाटेच्या वेळी व्यायामासाठी घराबाहेर पडणार्यांना होतो.
दरम्यान नसबंदी केल्यानंतर गळ्यात पट्टा बांधलेल्या कुत्र्यांनाही पिले होत असल्याच्या तक्रारी सभागृहात अनेकवेळा नगरसेवकांनी केल्या आहेत. तसेच नगरसेवकांनी शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या किती आहे, अशी विचारणा केल्यावर प्रशासनाला नेमकी संख्या सांगता आलेली नाही. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची गणना करण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी 2018 मध्ये शहरातील भटक्या कुत्र्यांची गणना केली होती, तेव्हा कुत्र्यांची संख्या तीन लाखांच्या घरात होती.
या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने चार वर्षांनंतर आता शहरातील भटक्या कुत्र्यांची गणना करण्याचा निर्णय घेतला आहे. हे काम क्यूआर कोड सोलूशन्स या संस्थेला देण्यात आले आहे. पुढील वर्षभरात ही गणना पूर्ण करण्याची मुदत या संस्थेला देण्यात आली आहे. या संस्थेस 1 जानेवारीपासून गणना सुरू करण्याचे आदेश दिल्याची माहिती महापालिकेच्या प्रभारी मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका फुंडे-भोसले यांनी दिली.