

हिरा सरवदे
पुणे: भूसंपादन आणि इतर कारणांमुळे मिसिंग (रखडलेले) रस्त्यांचा आराखडा (डीपीआर) तयार करण्यासाठी महापालिकेकडून सल्लागाराची नेमणूक केली जाणार आहे. यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात पाच किलोमीटर लांबीच्या मिसिंग लिंकचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. शहरातील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जवळपास 33 लाख 24 हजार 582 इतकी वाहने रस्त्यावर धावतात.
वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेकडून नवीन रस्ते तयार केले जातात. रस्त्यासाठी जागा ताब्यात घेण्यासाठी जागा किंवा घरमालकांना टीडीआर आणि एफएसआयच्या माध्यमातून मोबदला दिला जातो. यासाठी प्रशासनाला एक प्रक्रिया राबवावी लागते. यामध्ये वेळ जातो. शिवाय जागामालकांकडून टीडीआर आणि एफएसआय नाकारूल रेडीरेकनरच्या तीनपट दराने रोख मोबदल्याची मागणी केली जाते. त्यामुळे भूसंपादन होत नाही. परिणामी. रस्त्यांची स्थिती अर्धवटच राहते.
या पार्श्वभूमीवर पालिकेने ऑगस्ट महिन्यात एमआयटी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मदतीने अभ्यास केला. महापालिका हद्दीमध्ये समावेश झालेल्या गावांचा डीपी (विकास आराखडा) आणि आरपी (प्रादेशिक विकास आराखडा) डोळ्यांसमोर ठेवून अभ्यास गटाने प्रत्यक्ष जागेवर जाऊन रस्त्याची पाहणी केली. या पाहणीमध्ये समाविष्ट गावे आणि महापालिकेच्या मूळ हद्दीमध्ये 390 लिंक (ठिकाणे) मधील 273.22 किमी रस्ते मिसिंग असल्याचे समोर आले. मिसिंग रस्त्यामध्ये 2-3 किमीपासून 100, 200 मीटर लांबीच्या अंतराचा समावेश आहे.
दरम्यान, मिसिंग रस्त्यांचा अभ्यास करणार्या गटाने शहर व उपनगरातील विविध रस्त्यांना जोडणार्या 75 किमी मध्यवर्ती वर्तुळाकार मार्गाची (रिंगरोड) आखणी केली आहे. यामध्ये 25 किमी लांबीच्या मिसिंग लिंक आहेत. नवीन प्रकल्प आणण्यापेक्षा मिसिंग लिंक जोडल्यास वाहतुकीचा प्रश्न बर्यापैकी सुटू शकतो.
याबाबत दैनिक 'पुढारी'ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासकीय पातळीवर गतीने हालचाली होऊन मिसिंग लिंक जोडण्यासाठी प्रकल्प आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे महापालिकेचे वाहतूक नियोजन अधिकारी निखिल मिजार यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात पाच किमी लांबीच्या लिंक जोडण्यात येणार असल्याचेही मिजार यांनी सांगितले.
नियोजित मध्यवर्ती वर्तुळाकार मार्ग (रिंग रोड)
बावधण – पाषाण – नियोजित पंचवटी बोगदा मार्गे – कोथरूड – महात्मा सोसायटी – वारजे जुना जकात नाका – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – दुघाने लॉन्स – नियोजित कर्वेनगर सनसिटी पुल – सिंहगड रस्ता – गोयलगंगा चौक – नियोजित तळजाई टेकडीखालून बोगदा – विणकर सभागृह – सातारा रोड – बिबवेवाडी – अप्पर डेपो – हनुमान चौक – कोंढवा – तालाब – एनआयबीएम रोड – रहेजा चौक – मोहम्मद वाडी – नियोजीत टि.पी. स्कीम रस्ता – ससाणे नगर – वैभव थिएटर – हडपसर गाडीतळ – कालव्यामार्गे साडेसतरा नळी – ऍमनोरा पार्क – केशव नगर – नियोजीत पीपी तत्वावरील नदीवरील पुल – खराडी – नगर रस्ता – लोहगाव – धानोरी – खडकी कॅटोन्मेंट – औंध – बाणेर – पाषाण
ही कामे करणार सल्लागार
नियोजित मध्यवर्ती वर्तुळाकार मार्गावर सध्या अस्तित्वात असलेल्या 50 किमी लांबीच्या रस्त्याचा सर्व्हे.
मिसिंग असलेल्या 25 किमी लांबीच्या रस्त्यासाठी किती जागा संपादित करावी लागणार आहे, त्यासाठी किती खर्च येणार आहे.
जागांचे मालक कोण आहेत.
किती जागा शासकीय आहे.
अस्तित्वातील व मिसिंग रस्त्याचा प्रकल्प आराखडा तयार करून खर्च किती येईल.