पुणे : पालिकेचा 12 संस्थांना दणका; शहराचे विद्रूपीकरण केल्याचा ठपका

पुणे : पालिकेचा 12 संस्थांना दणका; शहराचे विद्रूपीकरण केल्याचा ठपका
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सार्वजनिक ठिकाणी पोस्टर्स चिकटवणारे ब्यूटीपार्लर व्यावसायिक आणि अधिकार्‍यांच्या भावी पिढ्या घडवणार्‍या स्पर्धा परीक्षा अभ्यासिकांना महापालिकेच्या कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाने दणका दिला आहे. शहराचे विद्रूपीकरण केल्याचा ठपका ठेवत 12 संस्थांच्या विरोधात थेट पोलिसांत गुन्हे दाखल केले आहेत.

जी-20 परिषदेच्या निमित्ताने शहरातील पदपथ, डिव्हायडर, चौकांमध्ये सुशोभीकरण सुरू आहे. सार्वजनिक भिंतींवरही पेंटिंग काढण्यात येत आहेत. यासाठी मागील महिनाभरापासून महापालिका प्रशासन काम करीत आहे. परंतु, यानंतरही दुभाजकांना पेंटिंग केल्यानंतर काही तासांतच त्यावर गुटखा आणि पिचकार्‍या मारून पाणी फेरले जात आहे. तसेच, व्यवसायाची जाहिरात करणार्‍यांकडून सार्वजनिक भिंती, झाडे, दिशादर्शक फलक, विजेचे डी.पी., स्वच्छतागृहांवर पोस्टर्स चिकटवून विद्रूपीकरण करण्यात येत आहे.

महापालिकेने मागील वर्षभरात शहरातील 55 हजारांहून अधिक अनधिकृत बोर्ड, बॅनर काढले आहेत. तसेच अनेकांना नोटीस बजावल्या आहेत. या कामासाठी महापालिका दरमहा एक ते सव्वाकोटी रुपये खर्च करीत आहे. परंतु, यानंतरही विद्रूपीकरणाचे काम जोमात सुरू आहे. या विद्रूपीकरणाला ब्रेक लावण्यासाठी महापालिकेने कडक पावले उचलली आहेत.

महापालिकेच्या कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने शहरातील मध्यवर्ती लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता आणि शास्त्री रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी पोस्टर्स चिकटवणार्‍यांविरोधात पोलिस कारवाई सुरू केली आहे. यामध्ये प्रामुख्याने स्पर्धा परीक्षांच्या क्लास चालक, ब्यूटीपार्लर व्यावसायिक आणि जागा खरेदी-विक्री करणारे व्यावसायिक आढळून आले आहेत. उपायुक्त अविनाश संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अनुक्रमे दत्तवाडी आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त आशिष म्हाडदळकर यांनी दिली.

गुन्हे दाखल केलेल्यांची यादी
फेबिना इंटरनॅशनल सलोन अ‍ॅण्ड अ‍ॅकॅडमी, सोने तारण कर्ज, ज्ञानज्योती अभ्यासिका , ऍसपायर अभ्यासिका, टपरस क्लब अभ्यासिका , शारदा अ‍ॅकॅडमी, फ्यूजन स्टडी क्लब अभ्यासिका, महाराष्ट्र अभ्यासिका, सुन्या आय.ए.एस., अर्थ व्यवस्था मोफत कार्यशाळा , रांजणगाव पार्क येथे प्रतिगुंठा जागा विक्री , पोलिस भरती, आरंभ लर्निंग सेंटर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news