पुणे : दोन गावांना वगळण्यास पालिका तयार : आयुक्त

पुणे : दोन गावांना वगळण्यास पालिका तयार : आयुक्त

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेतून फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही दोन्ही गावे वगळण्याचा ठराव मंजूर करून शासनास पाठविण्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीचे इतिवृत्तात (मिनिट्स) आम्हाला प्राप्त झाले आहेत, अशी स्पष्टोक्ती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मंगळवारी दिली.  राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिका हद्दीमध्ये फुरसुंगी आणि उरुळी देवाचीसह 11 गावांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर या गावांना महापालिकेने आकारलेला कर जास्त आहे, तसेच पालिकेकडून कोणत्याही सोयीसुविधा मिळत नाहीत, असा आरोप करीत फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांना महापालिकेतून वगळण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली होती.

त्यानुसार मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन्ही गावे वगळण्याची घोषणा केली होती. मात्र, शासनाकडून त्याबाबत कोणतेही आदेश काढण्यात आले नाहीत. मात्र, ही गावे वगळण्यासाठी महापालिकेने ठराव करून शासनास पाठवावा लागणार आहे. त्याबाबतचा उल्लेख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीच्या इतिवृत्तात आहे. त्यानुसार महापालिकेस हे इतिवृत्त प्राप्त झाले असून, त्यानुसार ठराव करणे पालिकेस बंधनकारक आहे. मात्र, महापालिकेने या गावांमध्ये आतापर्यंत सुमारे 300 कोटींचा खर्च केला असून, त्या ठिकाणी 2 नगररचना योजनाही प्रस्तावित केल्या आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासन त्यास सकारात्मक नव्हते. मात्र, हे शासनाचे आदेश असल्याने त्याची अंमलबजावणी महापालिकेस करणे बंधनकारक असून, त्यानुसार लवकरच ठराव मान्य करून पाठविण्यात येणार असल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news