

सुनील जगताप
पुणे : महापालिकेच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी बांधण्यात आलेले जलतरण तलाव जलतरणपटूंसाठी सज्ज झाले आहेत. पालिकेचे शहर आणि उपनगरांमध्ये 37 तलाव असून, त्यापैकी 6 तलाव बंद असल्याचे क्रीडा अधिकार्यांकडून सांगण्यात आले. वास्तविक शहरात आठ तलाव बंद असल्याचे समोर आले आहे. महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून जलतरण तलाव बांधले. पण, त्यांची देखभाल-दुरुस्ती करणे परवडत नाही.
दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून शहरातील आठ जलतरण तलाव बंद आहेत. त्यामुळे हे जलतरण तलाव प्रशासकीय अनास्थेमुळे 'पांढरे हत्ती' ठरत आहेत. ज्या ठिकाणी नागरी सुविधांसाठी मोकळ्या जागा आहेत, तेथे जलतरण तलाव बांधण्यास महापालिकेने सुरुवात केली. एक जलतरण तलाव बांधण्यासाठी किमान दीड ते दोन कोटी रुपये खर्च येतो. या जलतरण तलावांची अवस्था सुधारण्यासाठी किमान तीन कोटींहून अधिक खर्च येणार आहे. याची तरतूद 2023-24 च्या अर्थसंकल्पात झाली, तर जलतरण तलावांची स्थिती
सुधारणार आहे.
बंद पडलेले जलतरण तलाव
कै. केशवराव ढेरे जलतरण तलाव, येरवडा
कै. विठ्ठलराव तुपे क्रीडा संकुल, हडपसर
डॉ. अब्दुल कलाम जलतरण तलाव, पाषाण
कै. पांडुरंग तुकाराम कवडे जलतरण तलाव, घोरपडी गाव
सर्वे क्रमांक 4/11 खराडी
सर्वे क्रमांक 66 / 5 / 1, कोंढवा
स्व. आमदार रमेशभाऊ वांजळे जलतरण तलाव, वडगाव बुद्रुक
शहरात महापालिकेचे 37 तलाव असून, त्यापैकी केवळ 6 तलाव बंद आहेत. इतर तलाव सुस्थितीत असून, सुरूही आहेत. शाळांच्या परीक्षेनंतर तलावांवर प्रशिक्षणासाठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिका आणि क्रीडा विभाग प्रशासन सर्व तयारीनिशी सज्ज आहे.
मीनाक्षी ठाकूर , सहायक क्रीडा अधिकारी, पुणे महापालिका