पुणे : ट्राफिक वॉर्डन गायब! नियंत्रणावरून पालिका-पोलिसांचे एकमेकांकडे बोट

पुणे : ट्राफिक वॉर्डन गायब! नियंत्रणावरून पालिका-पोलिसांचे एकमेकांकडे बोट

हिरा सरवदे

पुणे : शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आणि वाहतूक पोलिसांना मदत करण्यासाठी दिलेले निम्म्यापेक्षा जास्त वॉर्डन गायब असून, केवळ शंभर ते सव्वाशे वॉर्डनच दररोज कामावर हजर असतात. या वॉर्डनच्या नियंत्रणावरून मात्र महापालिका आणि पोलिस प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे.

विशेषत: महापालिकेच्या हद्दीमध्ये समान पाणीपुरवठा योजनेसाठी खोदाई केल्याने आणि रस्ते योग्य प्रकारे पूर्ववत न केल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत. परिणामी, वाहतूक मंदावत आहे. गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळीपूर्वीच्या खरेदीदरम्यान तर येथील रस्त्यांवर पायी चालणे कठीण झाले होते. एकीकडे रस्त्यांवर कोंडी होत असताना नियंत्रण करणारे वाहतूक पोलिसांचे अस्तित्व दिसत नव्हते.

यावरून पोलिस दलावर सर्वच स्तरांवरून टीका होत होती. त्यानंतर महापालिका, पीएमआरडीए, मेट्रोने प्रकल्पांच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने पुण्यासाठी 33 आणि पिंपरी-चिंचवडसाठी 33, महामेट्रोने 264, पीएमआरडीएने दिवस आणि रात्रपाळीमध्ये 416, महापालिकेकडून गोल्फ क्लब चौकात 37 आणि सिंहगड रस्त्यावर 20 असे 803 ट्राफिक वॉर्डन पुरविल्याचे महापालिका अधिकार्‍यांनी दीड महिन्यापूर्वी सांगितले होते.

या सर्वांची यादी मोबाईल क्रमांकासह वाहतूक पोलिस अधिकार्‍यांकडे दिल्याचेही सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र वाहतूक पोलिसांच्या मदतीला केवळ 305 वॉर्डनच देण्यात आले. त्यातही दररोज केवळ शंभर ते सव्वाशेच वॉर्डन कामावर हजर असतात. त्यामुळे महापालिकेला 600 वॉर्डन देण्यासंदर्भात पाच ते सहा दिवसांपूर्वीच पत्र देण्यात आल्याचे वाहतूक पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी देण्यात आलेल्या वॉर्डनवर नियंत्रण ठेवण्याची, त्यांना काम लावण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांची आहे. आम्ही पुरविलेले वॉर्डन कामावर येत नसतील तर वाहतूक पोलिसांनी आम्हाला कळवायला हवे, त्यानंतर आम्ही व्यवस्था करू, नाहीतर पोलिसांनी अनुभवी संस्था किंवा ठेकेदार निवडावा, त्याचे बिल आम्ही देऊ.

                      – डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

ज्या ठिकाणी प्रकल्पांची कामे सुरू आहेत अशाच ठिकाणी आम्हाला वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी वॉर्डन देण्यात आले आहेत. आम्हाला 305 वॉर्डन देण्यात आले आहेत. त्यातही दररोज शंभर ते सव्वाशेच वॉर्डन कामावर असतात. त्यामुळे वॉर्डनची उपस्थिती आणि आणखी 600 वॉर्डन मिळण्यासाठी महापालिकेला पत्र दिले आहे. जे आमच्याकडे काम करतात, त्यांची हजेरी आम्ही आमच्या कर्मचार्‍यांसोबत घेतो. जे आमच्याकडे कामच करीत नाहीत ते कामावर येतात की नाही, हे आम्ही सांगू शकत नाही.

                                              – विजय मगर, उपायुक्त, वाहतूक पोलिस

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news