

पुणे: आगामी महापालिका निवडणुकीसाठी नगरविकास विभागाने तयार केलेली प्रारूप प्रभागरचना राज्य निवडणूक आयोगाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. ‘अ’ वर्ग महापालिकांच्या प्रारूप प्रभागरचनेची छाननी (स्क्रूटिनी) येत्या शुक्रवारी होणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी मागविलेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी पार पडली होती. आयएएस अधिकारी व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सुनावणीदरम्यान एकूण 5,922 हरकती नोंदविल्या होत्या. (Latest Pune News)
मात्र, सुनावणीसाठी प्रत्यक्ष हजर राहिलेल्या नागरिकांची संख्या केवळ 828 इतकीच होती. यामध्ये प्रभाग क्रमांक 24, 34, 38 आणि 19 मधील हरकतदार सर्वाधिक प्रमाणात उपस्थित होते. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर तयार केलेला अहवाल नगरविकास विभागाकडे सादर करण्यात आला होता. त्यानंतर बुधवारी नगरविकास विभागाने हा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला आहे.
छाननीची प्रक्रिया पुन्हा पार पडणार
राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भात पुणे, बृहन्मुंबई, पिंपरी-चिंचवड, ठाणे आणि नागपूर या ‘अ’ वर्ग महापालिकांच्या निवडणूक अधिकाऱ्यांना शुक्रवारी बैठकीसाठी बोलावले आहे. त्यादिवशी अहवालानुसार छाननीची प्रक्रिया पुन्हा पार पडणार आहे. आयोगाच्या कार्यक्रमानुसार अंतिम प्रभागरचना 4 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे.