

पुणे: वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय व दंत महाविद्यालय तसेच संलग्नित रुग्णालयांमधील गट- क तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी सुरू असलेल्या राज्यस्तरीय ऑनलाइन स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्याचा आदेश वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिला आहे. (Latest Pune News)
राज्यातील अनेक भागांत मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, या आपत्कालीन परिस्थितीमुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचणे पावसामुळे जिकिरीचे व अडचणीचे ठरले होते. या अनुषंगाने सर्व परीक्षार्थीचे पुढील होणारे नुकसान टाळण्यासाठी वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री मिसाळ यांनी तत्काळ परीक्षा पुढे ढकलण्याचे आदेश दिले.