तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या मालमत्ता कर, मिळकत कर आणि पाणीपट्टीची डिसेंबरअखेर एकूण वसुली 12 कोटी 76 लाख रुपये झाली आहे. एकत्रित करवसुलीचे शंभर टक्के उद्दिष्ट गाठण्यासाठी आर्थिक वर्षाच्या उर्वरित तीन महिन्यांत प्रशासनाने कायदेशीर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. मोठ्या थकबाकीदारांच्या नावांची यादी वर्तमानपत्रात जाहीर करणे, थकबाकीदारांच्या घरांसमोर, व्यवसायाच्या ठिकाणी ढोलबाजा पथके वाजवून थकित करभरणा करण्यासाठी आवाहन करणे, जप्ती वॉरंट बजावणे, मालमत्ता सीलबंद करणे आणि अनधिकृत नळजोडधारकांनी दंडाची रक्कम न भरल्यास त्यांचे नळजोड कायमस्वरूपी बंद करण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असल्याचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी शुक्रवारी (दि. 22) सांगितले.
नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कंपनीकडे मोठी थकबाकी
तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील नॅशनल हेवी इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सर्वांत मोठी थकबाकीदार असून कंपनीची एकूण थकबाकी तब्बल 10 कोटी 72 लाख 83 हजार 225 रुपये आहे. नगर परिषदेच्या एकूण मालमत्ता कराच्या मागणीपैकी सुमारे 47 टक्के थकबाकी या एकट्या कंपनीकडे आहे. निवडणुकीची संधी मतदानापूर्वी साधून वॉर्डातील उमेदवारालाच पाच वर्षांच्या टॅक्सची थकबाकी भरायला लावणा-या प्रवृत्तींची संख्याही लक्षणीय आहे. निवडणूक लांबल्याने यंदा सात वर्षांच्या टॅक्सचा बोजा पडेल, असे एका माजी नगरसेवकाने नाव प्रसिध्द न करण्याच्या अटीवर सांगितले.
मार्चअखेर शंभर टक्के करवसुलीसाठी नियोजन केले आहे. आतापर्यंत सुमारे 13 कोटींची वसुली झाली असून, उर्वरित 29 कोटी रुपयांची थकबाकी मार्चअखेर वसूल करण्याचे उद्दिष्ट आहे. व्याज आणि दंडाचा भार टाळायचा असेल तर थकबाकीदार नागरिक, व्यावसायिकांनी करभरणा वेळेत केला पाहिजे.
– एन. के. पाटील, मुख्याधिकारी
हेही वाचा