कोंढवा: महापालिकेकडून नागरिकांच्या पैशांची नुसती उधळपटी सुरू असून, अधिकारी अथवा कर्मचार्यांवर कुणाचाही अंकुश राहिला नसल्याचे चित्र दिसून येत आहे. कोंढवा परिसरातील साळुंखे विहार रस्त्यावरील अतिक्रमणांवर धडक कारवाई करण्यासाठी दोन ट्रक आणि पोलिस बंदोबस्तासह आलेले महापालिकेचे पथक कारवाई न करताच रिकामे हात हलवत परत निघून गेले. या ठिकाणी कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
कोंढवा खुर्द आणि वानवडीची हद्द दर्शविणार्या 80 फूट रुंदीच्या साळुंखे विहार रस्त्यावर गेल्या काही वर्षांपासून अतिक्रमणे झाल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे. या ठिकाणी होणार्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक आणि नागरिक त्रस्त झाले असून, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. कारवाई करणारे अधिकारी आळशी असल्यामुळे या रस्त्याचा श्वास काही वर्षांपासून गुदमरल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
प्रामाणिकपणे कर भरणारे लोक जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून प्रवास करीत आहेत. अतिक्रमणांमुळे 80 फूट रुंदीचा रस्ता सध्या अवघा 20 फुटांचा झाला आहे. परिसरातील व्यावसायिकांनी अतिक्रमणे केल्यामुळे हा रस्ता अरुंद झाला आहे. पादचार्यांना पदपथावरून चालता येत नसल्याने जीव मुठीत घेऊन त्यांना मुख्य रस्त्यावरून वाहनांच्या गर्दीतून चालावे लागत असल्याचे श्रीकांत श्रीवास्तव यांनी सांगितले.
या रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास महापालिकेचे धडक कारवाई पथक दोन ट्रक घेऊन या ठिकाणी आले. या वेळी बंदोबस्तासाठी एक मोठी पोलिस गाडीही आली होती. मात्र, रस्त्यावर भरलेला बाजार या पथकाच्या गाड्या येण्याअगोदर केवळ दहा मिनिटांत गायब झाला.
गाड्यांमधील अधिकारी, कर्मचारी, पोलिस खाली उतरले आणि त्यांनी केवळ दिखावा केला. त्यानंतर कोणतीही कारवाई न करता रिकाम्या हाताने हे पथक परत गेले. यामुळे नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यांनी प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.
साळुंखे विहार रस्त्यावर कारवाई करायची नव्हती. तुकाई टेकडी येथे कारवाईसाठी जायचे होते. सासवडमार्गे पथकाची वाहने गेली की त्या ठिकाणच्या व्यावसायिकांना कारवाई होणार असल्याची कुणकुण लागते. त्यामुळे साळुंखे विहार रस्त्याकडे जातोय, असे दाखवून कारवाई मात्र तुकाईदर्शन येथे करण्यात आली.
- सचिन उताळे, अधिकारी, अतिक्रमण निर्मूलन विभाग, महापालिका