पुणे : महापालिकेत समाविष्ट करण्याऐवजी टीपी स्कीम राबवा

पुणे : महापालिकेत समाविष्ट करण्याऐवजी टीपी स्कीम राबवा
Published on
Updated on

समीर सय्यद

पुणे : पुणे छावणी परिषद (कॅन्टोन्मेंट बोर्ड) महापालिकेमध्ये समाविष्ट केल्यास हा निर्णय चुकीचा ठरेल. एकेकाळी कॅन्टोन्मेंट बोर्ड हे शहराच्या बाहेर होते. परंतु वाढत्या नागरीकरणामुळे ते आता शहराचा मध्यवर्ती भाग बनले आहे. बोर्ड महापालिकेत समाविष्ट करण्यापेक्षा या ठिकाणी टीपी स्किम राबवावी, असे मत निवृत्त नगर नियोजनकार रामचंद्र गोहाड यांनी दैनिक 'पुढारी'शी बोलताना व्यक्त केले.

कॅन्टोन्मेंट हे सैन्य दलाच्या कामकाज आणि सैन्य दलातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या वास्तव्यासाठी स्थापित केलेली वस्ती आहे. या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांचा तसा फारसा संबंध येत नाही. परंतु गेल्या काही वर्षांत नागरीकरण मोठ्या प्रमाणात झाले. पुणे कॅन्टोमेंन्टची लोकसंख्या वाढली असून, उपलब्ध सोयीसुविधा अपुर्‍या पडत आहेत.

या भागात मर्यादित चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) असून, पूर्वी काहींनी बांधकाम परवानगी घेऊन इमारती उभ्या केल्या. मात्र, त्यानंतर बोर्डाने उंच इमारतींना परवानगी देणे बंद केले. त्यामुळे आज सध्या असलेल्या बांधकाम क्षेत्राइतकेच बांधकाम करण्याची परवानगी दिली जाते. त्यामुळे बांधकामासाठी मर्यादा येतात.

पुणे महापालिकेचा 1978 मध्ये पुनर्विकास आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार समितीची स्थापना केली होती. त्यात कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश केला होता. परंतु कॅन्टोन्मेंट कायद्यातील तरतुदीनुसार त्यांना मोठ्या विकासकामांना वाव नाही. त्यामुळे त्यांना समितीमध्ये सदस्य करूनही त्याचा काही उपयोग झाला नाही, अशी आठवणही गोहाड यांनी सांगितली.

यापूर्वी झाला होता प्रयत्न…
शरद पवार हे केंद्रीय संरक्षणमंत्री होते. त्या वेळी पुण्यातील काही बांधकाम व्यावसायिकांनी त्यांना कॅन्टोन्मेंटमध्ये मोकळ्या जागा आहेत. त्याठिकाणी बांधकामासाठी वाव आहे, त्यामुळे कॅन्टोन्मेंट महापालिकेत समाविष्ट करा, अशी मागणी केली होती. या संदर्भात त्या वेळी चर्चा ही सुरू झाली. परंतु संरक्षण विभागातील अधिकार्‍यांनी हा प्रयत्न हाणून पाडला होता. पुन्हा एकदा हा प्रयत्न सुरू झाला आहे. मात्र, त्याप्रमाणेच आताही कॅन्टोन्मेंट महापालिकेत समाविष्ट होण्याची शक्यता कमीच आहे, असे गोहाड यांनी सांगितले.

टीपी स्किम का ?
पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये बंगले मोठ्या प्रमाणात असून, ते एकत्र करून दहा एकर क्षेत्राच्या पुढील क्षेत्रात नगर रचना योजना राबविता येते. त्यामुळे कॅन्टोन्मेंट महापालिकेत समाविष्ट करण्यापेक्षा त्याठिकाणी टीपी स्किम राबविल्यास कॅन्टोन्मेंटचे वैभव कायम राहील, असेही मत गोहाड यांनी व्यक्त केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news