

पुणे : नवीन शैक्षणिक वर्ष तोंडावर असतानाही शालेय विद्यार्थी वाहतूक करणार्या अनेक वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिकिट) अजूनही नूतनीकरण झालेले नाही. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे यांच्याकडून शालेय खासगी स्कूल व्हॅन, बसमालकांना तत्काळ योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करण्याचे ‘अंतिम’ आवाहन केले आहे. अन्यथा, ‘आरटीओ’कडून कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. (Pune News Update)
दिवे (ता. पुरंदर) येथील ब्रेक टेस्ट ट्रॅक कार्यालयात शालेय वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी शनिवार, रविवार आणि शासकीय सुट्यांमध्येही विशेष तपासणी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत हे कामकाज सुरू राहणार आहे. या सुविधेचा लाभ घ्यावा. अधिक माहिती किंवा अडचणींसाठी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, संगम ब्रिज येथील आरटीओ कार्यालय पुणे यांच्याशी संपर्क साधा, असे आवाहन केले आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. आम्ही शाळा प्रशासन आणि वाहनमालकांना वेळोवेळी सूचना दिल्या आहेत आणि विशेष सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. तरीही जर वाहनधारकांनी तपासणी केली नाही, तर वाहनधारकांवर कारवाई करण्यात येईल. विनाफिटनेस तपासणी वाहने रस्त्यावर आढळल्यास त्यांना तत्काळ जप्त केले जाईल आणि संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे
नवीन शैक्षणिक वर्षाची तयारी सुरू असताना आम्हा पालकांना आमच्या मुलांच्या सुरक्षित वाहतुकीची चिंता सतावत आहे. शाळा सुरू व्हायला काहीच दिवस राहिले आहेत. पण, अजूनही अनेक बस फिटनेसशिवाय धावणार असतील, तर मुलांच्या जिवाला धोका आहे. ’आरटीओ’ने नुसते आवाहन न करता कठोर कारवाई करावी.
गणेश सगर, पालक