

वडगाव मावळ(पुणे); पुढारी वृत्तसेवा : प्लास्टिक वापरावर बंदी घातलेली असताना शहरातील कचरा व्यवस्थापन करताना त्यामध्ये विघटन न होणार्या प्लास्टिकचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळल्याने आठवडे बाजारात छापा मारून प्लास्टिकचा वापर करणार्या भाजी विक्रेत्यांवर कारवाई केली. मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांच्या आदेशानुसार व उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी, दि.27 रोजी नगरपंचायत पथकाने ही कारवाई केली.
नगरपंचायत पथकाने शासनाने प्रतिबंधक असलेल्या जवळपास 30 किलो प्लास्टिक पिशव्या येथून जप्त केल्या. एकेरी वापरल्या जाणार्या प्लास्टिकपासून बनवलेल्या वस्तूंवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे 1 जुलै 2022 पासून देशभरात सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे.
विशेष म्हणजे जर कोणी सिंगल-यूज प्लास्टिकचा वापर करताना आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक आणि त्यांनतर गुन्हा दाखल करण्याची सुद्धा तरतूद करण्यात आली आहे. असे असताना शहरातील अनेक ठिकाणी सिंगल-यूज प्लास्टिकचा खुलेआम वापर केला जात आहे. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने आज थेट छापा टाकून संबंधितांवर कारवाई करायला सुरवात केली.