

पुणे: मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर रस्त्यात थांबलेल्या ट्रकला कार धडकून झालेल्या अपघातात कारमधील एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
भीमा राजेंद्र जाधव (रा. धायरी) असे मृतकाचे नाव आहे. याबाबत कारचालक शुभम सुनील डुबळे (वय 27, रा. पूर्वा हाईट्स, भैरवनाथ मंदिराजवळ, धायरी) याने आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला.
पोलिसांच्या माहितीनुसार, शुभम आणि त्याचा मित्र भीमा हे दिवे घाट परिसरातील श्री कानिफनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. शनिवारी पहाटे पावणेतीन वाजता ते बाह्यवळण मार्गावरून निघाले होते. आंबेगाव परिसरातील बाबाजी पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या कडेला ट्रक थांबला होता. रस्त्यात अंधार होता. त्यामुळे थांबलेला ट्रक कारचालक शुभमला दिसला नाही व कारची ट्रकला धडक बसली. यात गंभीर जखमी भीमाचा मृत्यू झाला. ट्रक चालकाच्या बेजबाबदारपणामुळे दुर्घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.पीएसआय थोरात तपास करीत आहेत.