बेल्हे : कोट्यवधींचा चुना लावणारी टोळी पुन्हा कार्यरत

file photo
file photo
Published on
Updated on

बेल्हे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : कोट्यवधी रुपयांचा चुना लावल्याच्या तक्रारीवरून दोन वर्षे कारावासात राहिलेली टोळी जामिनावर बाहेर येताच या टोळीने नवीन कंपनींच्या माध्यमातून दामदुपटीचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना पुन्हा गंडा घालण्यास सुरुवात केल्याच्या तक्रारी आहेत. आळेफाटा पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी या टोळीविषयी काय भूमिका घेतात ? याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. आपल्याकडे गुंतवणूक केलेल्या ठेवीदारांनी परतफेडीच्या रकमेचा धनादेश परत आलेले एक उदाहरण दाखवा अन् एक कोटी रुपये रोख घेऊन जा, म्हणणार्‍या 'भागवत'चार्याच्या विष्णू कंपनीतून आळेफाटा परिसरातील अनेक ठेवीदारांचे परतफेडीचे धनादेश विनारकमेचे परतल्याने गुंतवणुकदारांनी आळेफाटा, नाशिक, औरंगाबाद येथे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

संबंधित महाठकांच्या टोळीला अटक झाली. दोन वर्षांच्या कालावधीनंतर उच्च न्यायालयाने जमीन मंजूर केल्याने हे महाशय बाहेर आले. आळेफाटा, बेल्हे, राजुरी, बोरी बुद्रुक परिसरातील शेकडो गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या रकमेचा परतावा मिळाला नाही, तेच नवीन कंपनीच्या माध्यमातून दामदुप्पट रक्कम देण्याचा फंडा या टोळीने सुरू केल्याने तक्रारदारांनी धसका घेतला.

या संस्थेत साखळी पध्दतीने गुंतवणूक केली जात असून, या संस्थेत गुंतवणूक करणार्‍या ठेवीदारांना बक्षिसे, विमान प्रवास, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तीन दिवसांचे मुक्काम आणि अल्पवधीत दुप्पट, तीनपट रकमेचे आमिष दाखविले जात आहे. या कंपनीत गुंतवणूक केली, तर तुमचे जुन्या मल्टीस्टेटमध्ये अडकलेली रक्कम परत मिळेल,असे आमिषही दाखविण्यात आल्याने राजुरी, बेल्हे, बोरी बुद्रुक, नारायणगाव, मंचर, घोडेगाव, आळेफाटा भागांतील नागरिकांनी पुन्हा गुंतवणूक केली असल्याचे बोलले जाते.

या टोळीच्या नवीन कंपनीत गुंतवणूक करणार्‍या ठेवीदारांना भेटवस्तू, विमानप्रवास व परतफेडीच्या रकमेचे धनादेश तत्काळ दिले जातात. पण त्या ठेवीदारांना गुंतवणूक केलेली रक्कम मुदतीनंतर त्या ठेवीदारांना रक्कम परत मिळत नाही,असे अनुभव आळेफाटा येथील नागरिकांना यापूर्वीचे अनुभव असल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे.

नाशिक येथे मुख्य कार्यालय असलेल्या 'भागवत'चार्याचा उद्घाटनप्रसंगीचा भपका पाहून या संस्थेच्या आळेफाटा येथील शाखेत पारनेर, आंबेगाव, खेड, शिरूर, संगमनेर तालुक्यांतील ठेवीदारांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली असल्याचे समजते. आळेफाटा पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे, सहायक पोलिस निरीक्षक आता काय भूमिका घेतात याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news