पिरंगुट : पुढारी वृत्तसेवा : मुळशी तालुक्यात अवाढव्य फ्लेक्स, होर्डिंग्जची स्पर्धा लागलेली पाहायला मिळते. चांदणी चौक ते भुगाव, भुकूम, पिरंगुट, पौड या रस्त्यांवर त्यांची भाऊगर्दी झालेली आहे. भुगाव, भुकूम व पिरंगुट परिसरात या होर्डिंग्जने तर निसर्गसंपन्न मुळशीचे फारच विद्रूपीकरण करून टाकले आहे. वादळी वार्यात व विजांच्या पावसात त्यांची धोकादायकता वाढून मुंबई येथे झालेल्या घाटकोपर दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते. प्रशासन मात्र याकडे उघड्या डोळ्यांनी पाहत सुस्त पडले आहे.
गतवर्षी पिरंगुट घाट परिसरात एक मोठे होर्डिंग्ज कोसळून त्याखालील महावितरणच्या इलेक्ट्रिक डीपीचे नुकसान झाले होते. सुदैवाने जीवितहानी यात झाली नव्हती. या घटनेनंतर संबंधित होर्डिंग्जधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आजतागायत अनधिकृत व धोकादायक होर्डिंग्जवर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासन सर्वसामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळ करीत असल्याचे दिसते. मुळशीत अनेक ठिकाणी भव्य होर्डिंग्ज असून, त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट गरजेचे आहे. त्यातले अनेक होर्डिंग्ज धोकादायक स्थितीत असून, ते लागलीच काढून टाकली पाहिजेत तसेच रस्त्यालगत कोणत्याही होर्डिंग्जला परवानगी देण्यात येऊ नये, याची खबरदारीही घेणे गरजेचे आहे.
कारण, असे होर्डिंग्ज धोकादायक असो वा नसो, वादळी वार्यात किंवा वीज पडण्याने ते क्षणात कोसळू शकतात व प्रवास करणार्या प्रवाशांचा जीव घेऊ शकतात. अनधिकृत व धोकादायक होर्डिंग्ज हटविल्यानंतर परवानाधारक होर्डिंग्जचे ठरावीक दिवसांनी स्ट्रक्चरल ऑडिट करणे व ते सार्वजनिक करणे गरजेचे आहे. ज्यामुळे भविष्यात धोकादायक होर्डिंग्जला लगाम घालता येऊ शकतो. मुळशीत कार्यरत असणारे प्रशासन म्हणजे मुळशी तहसील, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे जिल्हा परिषद, ग्रामपंचायत यांची एकत्रित अशी समिती बनवून या होर्डिंग्जवर नियंत्रण आणले गेले पाहिजे, नाहीतर हे सर्व प्रशासन एकमेकांवर जबाबदारी ढकलून होर्डिंग्जच्या दुर्घटना होतच राहतील. मुळशीकर नागरिकांना या होर्डिंग्जपासून जीविताचा धोका असून, तो दूर करणे गरजेचे आहे.
हेही वाचा