

Pune News
पुणे : सिंधू, चिनाब आणि झेलम या तीन नद्यांवर पुणे शहरातील जल अभियंते तब्बल पन्नास धरणे बांधण्याचे काम करीत असून, त्यांचे काम प्रगतिपथावर आहे. या धरणाचे काम पुण्यातील केंद्रीय जलविद्युत संशोधन संस्थेचे अभियंते करीत आहेत. तसेच, पुणे शहरातील मुळा-मुठा नदीच्या शुद्धीकरणावर पथदर्शी प्रकल्प राबविणार असल्याची माहिती शहरातील केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन विभागाचे संचालक प्रभात चंद्रा यांनी दिली.
खडकवासला परिसरातील केंद्र शासन संचालित केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र या संस्थेचा 14 जून रोजी 109 वा स्थापना दिन साजरा होत आहे. त्यानिमित्त येथे संस्थेचे संचालक डॉ. प्रभात चंद्रा यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. उत्तम परिणाम साधण्यासाठी अभियंते कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशिन लर्निंगसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. याव्यतिरिक्त भविष्यासाठी शाश्वत आणि अनुकूल उपाय विकसित करण्यासाठी हवामानबदलाच्या परिणामांचा अभ्यास तसेच क्षारता प्रवेश या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणार असून, धरण सुरक्षेशी संबंधित पैलूंसाठी एक उत्कृष्टता केंद्र विकसित केले जाणार असल्याचे चंद्रा यांनी सांगितले.
14 जून रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र आपला 109 वा स्थापना दिवस साजरा करीत असून, हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे. राष्ट्रीय जल अकादमीचे मुख्य अभियंता डी. एस. चासकर हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाची सुरुवात चासकर यांच्या 'जल प्रशासन' या विषयावरील व्याख्यानाने होईल आणि त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम, प्रश्नमंजूषा, वृक्षारोपण, उपक्रम आणि प्रतिकृतींना भेटी हे कार्यक्रम पार पडतील. केंद्रातर्फे देशविदेशात जल आणि विद्युतसंदर्भात केलेले उल्लेखनीय कार्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना, शालेय विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले.
देशात एकूण पाच हजार धरणे आहेत, त्यापैकी काही शंभर वर्षे जुनी आहेत. त्यांची कार्यक्षमता आणि सुरक्षितता वाढविण्याच्या उद्देशाने आमची संस्था काम करीत आहे. संस्थेने अफगाणिस्तान, भूतान, नेपाळ, सिंगापूरमध्ये बांधलेल्या धरणांचा प्रकल्प अहवाल तयार केला आहे. किनारी जलाशयासाठी कल्पसर प्रकल्पावरही काम सुरू आहे. हा प्रकल्प अंदाजे एक लाख 30 हजार कोटी रुपयांचा आहे, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. चंद्रा यांनी सांगितले की, आम्ही नद्यांच्या पाण्याच्या गुणवत्तेची काळजी घेण्यावरही लक्ष केंद्रित केले आहे. पुणे शहरातील मुळा-मुठा नद्यांच्या पाण्याच्या गुणवत्तेसाठी एक पथदर्शी प्रकल्प तयार केला आहे. त्यावरही काम सुरू करावयाचे आहे. आमच्या संस्थेतील धरण पुनर्वसन केंद्राच्या युनिटद्वारे देखील धरणांच्या कार्यक्षमतेबाबत संशोधनात्मक कार्य सुरू आहे. संयुक्त संशोधन प्रकल्पांसाठी राइट्स ऑर्गनायझेशन, आयआयटी मद्रास, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासोबत सामंजस्य करार केले आहेत.