

MPSC Prelims Exam 2025 Postponed Check New Date
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 28 सप्टेंबरला होणारी संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ अखेर पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यात पावसामुळे मराठवाडा तसेच इतर भागात झालेले नुकसान आणि हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही परीक्षा 9 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे.
28 सप्टेंबर रोजी एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील मराठवाडा आणि इतर भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेक गावं पाण्याखाली गेल्याने दळणवळणाला फटका बसला आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचणे हे आव्हानात्मकच होते. याशिवाय पूरस्थितीमुळे हजारो नागरिकांचा संसार पाण्यात वाहून गेला. अशा कठीण समयी विद्यार्थ्यांना परीक्षा देणे अशक्य होते. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थी संघटना आणि विविध राजकीय पक्षांनी देखील केली होती.
एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार की नाही असा संभ्रम निर्माण झाला असतानाच अखेर शुक्रवारी दुपारी एमपीएससीने अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून पत्रक पोस्ट करत परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा केली.
28 सप्टेंबरला होणारी एमपीएससीची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे का?
हो. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 26 सप्टेंबर रोजी (शुक्रवारी) पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा केली आहे. आता 28 सप्टेंबर रोजी ही परीक्षा होणार नाहीये.
एमपीएससीने पत्रकात काय म्हटले आहे?
28 सप्टेंबर 2025 रोजी राज्यातील 37 जिल्हाकेंद्रांवरील 524 उपकेंद्रांवर राज्यसेवा पूर्वपरीक्षा घेण्यात येणार होती. मात्र, राज्यातील पूरजन्य परिस्थितीमुळे अनेक जिल्ह्यातील गावांचा, तालुक्यांचा एकमेकांशी संपर्क तुटलेला आहे. तसेच राज्यातील हवामान खात्याने पुढील काही दिवसांत अतिवृष्टीचा इशारा दिला असून अशा परिस्थितीत कोणताही उमेदवार परीक्षेपासुन वंचित राहू नये यासाठी ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे, असे एमपीएससीने पत्रकात म्हटले आहे.
एमपीएससी राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा कधी होणार आहे?
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा - 2025, दिनांक 28 सप्टेंबर 2025 ऐवजी 9 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात येणार आहे.