

पुणे : एमपीएससीकडून महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीद्वारे 938 पदांच्या भरतीसाठी पूर्वपरीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा 4 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. गट-क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची सुरुवात झाली असून, उमेदवारांना 27 ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. (Latest Pune News)
एमपीएससीकडून उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक आणि लिपीक टंकलेखकपदाच्या भरतीसाठी ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे. उद्योग निरीक्षकपदाच्या 9 जागा भरल्या जाणार आहेत. तांत्रिक सहायकपदाच्या 4 जागा, कर सहायक 73 जागा आणि लिपिक टंकलेखकपदाच्या 852 जागांसाठी ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट-क सेवा परीक्षेला अर्ज करणारा उमेदवार भारतीय असणे आवश्यक आहे. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.
उद्योग निरीक्षकपदासाठी उमेदवाराकडे सांविधिक विद्यापीठाची, अभियांत्रिकीमधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका किंवा विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी असणे गरजेचे आहे. महाराष्ट्र गट-क सेवा परीक्षा दोन टप्प्यांत पार पडणार आहे. संयूक्त पूर्वपरीक्षा आणि त्यानंतर मुख्य परीक्षा घेतली जाईल. पूर्वपरीक्षा 100 गुणांसाठी असेल तर संयुक्त मुख्य परीक्षा 400 गुणांची असेल.
लिपिक टंकलेखक आणि करसहायकपदासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी द्यावी लागणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी 394 रुपये पूर्वपरीक्षेचे शुल्क असेल, तर मागासवर्गीय, ईडब्ल्यूएस आणि अनाथ प्रवर्गासाठी 294 रुपये तर माजी सैनिकांसाठी 44 रुपये शुल्क असेल. मुख्य परीक्षेसाठी 544 रुपये खुल्या प्रवर्गासाठी, मागासवर्गीय, ईडब्ल्यूएस आणि अनाथ प्रवर्गासाठी 344 रुपये तर माजी सैनिकांसाठी 44 रुपये परीक्षा शुल्क असेल.