पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन येथील सोरतापवाडी येथे ट्रकमधील सळया थेट काचामधून आरपार निघत थेट स्कूल बसमध्ये घुसल्या. बसचालकाने अचानक बेक लावल्याने बुधवारी दुपारी घडलेल्या अपघातात आठ शाळकरी मुले आणि शिक्षिका किरकोळ जखमी झाली आहे. शेजारून दुचाकीवर जाणारा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. जखमींना प्राथमिक उपचार करून घरी पाठविण्यात आले. (Latest Pune News)
पुण्याहून उरुळी कांचनकडे स्कूल बस मुलांना घरी सोडण्यासाठी जात होती. या बसमध्ये 20 ते 25 विद्यार्थी होते. बस उरुळी कांचन येथील सोरतापवाडी येथे आली असता बसच्या समोर अचानक एक दुचाकी आली. त्यामुळे स्कूल बसचालकाने बेक दाबला. पाठीमागून येणाऱ्या मालवाहू ट्रकमधील सळया बसची काच फोडून आरपार शिरल्या. या घटनेत आठ विद्यार्थी व शिक्षिका किरकोळ जखमी झाली. तर स्कूलबससमोर आलेला दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.
अपघातानंतर मुलांना तातडीने सुरक्षित बाहेर काढले, अशी माहिती उरुळी कांचन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिली. भांडगाव येथील ऑलम्पस शाळेतील मुले शाळेतील बसणे सहलीसाठी थेऊर येथे आले होते. नर्सरी पाहून जात असताना हा अपघात झाला. कादर लाला शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून सळ्या घेऊन जाणारा पिकअप चालक विठ्ठल रघुनाथ चौधरी यांच्यासह एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.