पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीमार्फत घेण्यात येणार्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेची सुधारित तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित परीक्षा 6 जुलै रोजी घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर एसईबीसी प्रवर्गातून अर्ज भरण्याची संधी उमेदवारांना दिल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा-2024 करीता दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी एकूण 274 रिक्त पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध केली असून, जाहिरातीनुसार संबंधित परीक्षा दिनांक 28 एप्रिल 2024 रोजी घेण्याचे नियोजित होते.
दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकद़ृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम 2024 दिनांक 26 फेब्रुवारी 2024 अनुसार राज्याच्या नियंत्रणाखालील पदांवरील नियुक्तीकरिता सामाजिक आणि शैक्षणिकद़ृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षणाची तरतूद केली आहे. प्रस्तुतप्रकरणी सामाजिक व शैक्षणिकद़ृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षणनिश्चिती करून सुधारित मागणीपत्र पाठविण्याबाबत शासनाला कळविण्यात आले. त्यानुसार आयोगाच्या दिनांक 21 मार्च 2024 रोजीच्या प्रसिद्धिपत्रकाद्वारे प्रस्तुत परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले होते.
आता संबंधित परीक्षा सुधारित दिनांकाला म्हणजेच शनिवारी (दिनांक 6 जुलै 2024) आयोजित करण्यात येईल. शासनाकडून प्राप्त सुधारित मागणीपत्रानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा 2024 परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण 524 पदांचा सुधारित तपशील एमपीएससीमार्फत जाहीर केला असून, अर्ज भरण्याचे वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा