बारामती : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या खटल्यातून भाजपचे आमदार गोपिचंद कुंडलिक पडळकर यांची बारामतीचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. पी. पुजारी यांनी निर्दोष मुक्तता केली. खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पडळकर हे मंगळवारी (दि. ३) बारामती न्यायालयात आले होते.
सन २०२० मध्ये आ. पडळकर यांनी शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेला कोरोना असे वादग्रस्त विधान केले होते. या प्रकरणी राष्ट्रवादीचे तत्कालीन युवक शहराध्यक्ष अमर धुमाळ यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात पडळकर यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी पडळकर यांच्या विरोधात भारतीय दंड विधान ५०५ (२) अन्वये पडळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. सहायक पोलिस निरीक्षक मुकुंद पालवे यांनी या प्रकरणाचा तपास करत पडळकर यांच्या विरोधात बारामती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या गुन्ह्यात जामिन घेतल्यानंतर वारंवार समन्स बजावून देखील पडळकर हे न्यायालयात हजर झाले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्या विरोधात अटक वाॅरंंट जारी केले होते. येथील न्यायाधिश पुजारी यांच्यासमोर हा खटला चालला. या खटल्यात चार साक्षीदार तपासण्यात आले. पोलिसांनी पडळकर यांच्या विरोधात ज्या कलमान्वये गुन्हा दाखल केला ते त्यांच्यासाठी लागूच होत नसल्याचा युक्तिवाद पडळकर यांच्या वकीलांनी केला. पंथ, धर्म, समुदाय यासाठी हे कलम लावले जाते. पडळकर यांच्या विधानाच्या अनुषंगाने कोणतीही दंगल भडकली नव्हती, अथवा धर्म-जातींमध्ये अराजकता निर्माण झालेली नव्हती. त्यामुळे हे कलम लावणे गैरलागू आहे. त्यांचे विधान व्यक्तिशः होते, समुदायाला अनुसरून नव्हते, असा युक्तिवाद करण्यात आला. न्यायालयाने तो ग्राह्य धरत पडळकर यांची निर्दोष मुक्तता केली.
निकालानंतर पडळकर म्हणाले, या प्रकरणी माझ्या विरोधात बारामती न्यायालयात खटला सुरु होता. त्यात माझी निर्दोष मुक्तता केली आहे.