महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठासोबत पुणे विद्यापीठाचा सामंजस्य करार..

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठासोबत पुणे विद्यापीठाचा सामंजस्य करार..

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, मुंबइ यांच्यात सोमवारी (दि.1) सामंजस्य करार करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्यचे संचालक प्रा. डॉ. संजय ढोले, विधी विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. नरेश वाघमारे आणि महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. दिलीप उके, कुलसचिव डॉ. प्रतापसिंह साळुंके यांच्या या सामंजस्य करारावर सह्या करून कराराचे आदानप्रदान करण्यात आले.

संयुक्तपणे विधी विद्यार्थ्यांसाठी व्यवसायाभिमुख पदवी, पदविका अभ्यासक्रम राबवून संशोधन वाढीसाठी एकत्र काम करणार असल्याचे कुलगुरू डॉ. गोसावी यांनी या वेळी सांगितले. विधी विद्यार्थ्यांसाठी विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदा, चर्चासत्रे आणि कार्यक्रमाचे आयोजन संयुक्तपणे करण्यात येणार असल्याचे डॉ. दिलीप उके यांनी या वेळी स्पष्ट केले. या सामंजस्य करारांतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, मुंबई यांच्यामध्ये विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचेही आदानप्रदान करण्यात येणार आहेत. तसेच, संशोधनासाठी दोन्ही विद्यापीठांच्या रिसोर्सचाही संयुक्तपणे वापर करण्यात येणार आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news