

पौड: पुढारी वृत्तसेवा : मुळशी तालुक्यातील धडवली येथे शेतकऱ्यांना मारहाण केल्या प्रकरणी अटकेत असलेल्या मनोरमा खेडकर (रा. नँशनल हाउसिंग सोसायटी, बाणेर पुणे) यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनविण्यात आली. त्यांचा जामीन नामंजूर करण्यात आला आहे.
पौड पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने महाडमधून मनोरमा खेडकरला गुरूवारी (दि. १८) सकाळी अटक केली. त्यानंतर पौड येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सुधीर. जी. बरडे यांच्या न्यायालयापुढे हजर करण्यात आल्यानंतर मनोरमा खेडकरला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनविण्यात आली होती. ती कोठडी २० जुलै रोजी संपल्यानंतर पुन्हा खेडकरला न्यायालयात हजर करण्यात आले असता तिला २२ जुलैपर्यत दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनविण्यात आली होती.
मंगळवारी (दि. २२) मनोरमा खेडकरला पौड येथे न्यायदंडाधिकारी सुधीर. जी. बरडे यांच्या न्यायालयापुढे हजर करण्यात आल्यानंतर त्यांचा जामीन नामंजूर करण्यात आला. तसेच १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनविण्यात आली. यावेळी सरकारी वकीलांनी आणखी काही आरोपी असून तपास सुरू असल्याचे न्यायालयाला सांगितले. तर फायरिंग झाले नाही, तसेच कोणाला जखमही झालेली नाही, असे मनोरमा खेडकरच्या वकीलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला.
मुळशीतील घडवली गावात शेतकऱ्यांना मनोरमा खेडकर यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून धमकाविल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी शेतकरी पंढरीनाथ कोंडीबा पासलकर (वय ६५, रा. केडगाव, आंबेगाव पुनर्वसन, ता. दौंड) यांनी पौड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. याप्रकरणी मनोरमा खेडकर यांच्यासह सात जणांविरुद्ध पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांचे स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक सोमवारी सकाळी बाणेरमधील खेडकर यांच्या बंगल्यावर धडकले होते. मात्र, कारवाईची कुणकुण लागल्यामुळे खेडकर दाम्पत्य थांबले नसल्याचे आढळून आले. मनोरमा दिलीप खेडकर, दिलीप खेडकर (दोघे रा. नॅशनल हौसिंग सोसायटी, बाणेर), अंबादास खेडकर (रा. आंबी, ता. हवेली) यांच्यासह सात जणांविरुद्ध पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. खेडकर यांच्यासोबत शेतकऱ्यांना धमकाविण्यासाठी आलेल्या अंगरक्षकांविरुद्ध (बाऊन्सर) गुन्हा दाखल आहे. आरोपींमध्ये महिला अंगरक्षकांचाही समावेश आहे.