![‘एक्सबीबी’चे पुण्यात सर्वाधिक रुग्ण; लाँग कोविड सिंड्रोमबाबत चिंता व्यक्त](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F10%2FXBB.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्यात आतापर्यंत एक्सबीबी व्हेरियंटचे 36 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी सर्वाधिक 21 रुग्ण पुण्यात आढळून आले आहेत. यात सर्वाधिक रुग्ण 41 ते 60 वर्षे वयोगटातील आहेत. एक्सबीबी व्हेरियंटचा संसर्ग सौम्य असल्याने बहुतांश रुग्ण घरगुती विलगीकरणात बरे झाले आहेत.
राज्यातील 36 रुग्णांपैकी 21 पुण्यात, 10 ठाण्यामध्ये, नागपूरमध्ये 2, अकोला, अमरावती आणि रायगड येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. यात 22 पुरुष आणि 14 महिला आहेत. एकूण रुग्णांपैकी 11 ते 20 वयोगटातील 2 रुग्ण, 21 ते 40 वयोगटातील 13, 41 ते 60 वर्षे वयोगटातील 14 रुग्ण आणि 60 वर्षांवरील 7 रुग्ण आहेत.
एक्सबीबी व्हेरियंटचा संसर्ग झालेल्या 36 पैकी 19 रुग्णांना काही प्रमाणात लक्षणे दिसून आली. उर्वरित रुग्ण लक्षणविरहित किंवा सौम्य स्वरूपाचे होते. 32 रुग्ण घरगुती विलगीकरणात बरे झाले, तर 4 रुग्णांना खबरदारीचा उपाय म्हणून अथवा घरगुती विलगीकरणाची सुविधा नसल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यांना ऑक्सिजन अथवा व्हेंटिलेटरची गरज भासली नाही. दोन रुग्ण वगळता इतर सर्वांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण झाले आहे. यातील 5 जणांनी बूस्टर डोस घेतलेला आहे. 6 रुग्णांमध्ये कोरोनाचा पुन:संसर्ग आढळून आला. या पार्श्वभूमीवर कोविड टास्क फोर्सची बैठक 24 ऑक्टोबर रोजी पार पडली.
बैठकीत या मुद्द्यांवर झाली चर्चा
सिंगापूर आणि इतर देशांमधील एक्सबीबी व्हेरियंटच्या अभ्यासातून संसर्ग सौम्य स्वरूपाचा असल्याचे आणि बहुसंख्य रुग्णांना घरगुती विलगीकरणात उपचार देणे शक्य असल्याचे लक्षात आले आहे. लाँग कोविड सिंड्रोमबाबत टास्क फोर्स सदस्यांनी चिंता व्यक्त केली. राज्यात मधुमेह, ब्रेन फॉग आणि हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढत आहे.
म्हणूनच कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांचे नियमित मॉनिटरिंग आवश्यक आहे असे अधोरेखित करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी मास्कची सक्ती नसली तरी रुग्णालये, दवाखाने यांच्या परिसरात आरोग्य कर्मचारी आणि इतर सर्वांनी मास्क वापरणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.