पिंपरी शहरात 3 हजार 884 घरांमध्ये आढळल्या डास अळ्या

पिंपरी शहरात 3 हजार 884 घरांमध्ये आढळल्या डास अळ्या

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : शहरामध्ये गेल्या अडीच महिन्यांत तब्बल 3 हजार 884 घरांमध्ये डास अळ्या आढळून आल्या आहेत. महापालिका आरोग्य विभागाकडून घरोघरी जाऊन करण्यात येणार्‍या कंटेनर सर्वेक्षणात ही बाब उघड झाली आहे. टायर, पंक्चर, भंगार मालाची दुकाने, बांधकामे आदी ठिकाणीदेखील तपासणी करण्यात आलेली आहे. याप्रकरणी 1 हजार 73 जणांना नोटिसा बजावल्या आहेत. त्याचप्रमाणे, 166 नागरिकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई केली आहे. महापालिकेने दंडापोटी एकूण 7 लाख 58 हजार 500 रुपये इतकी रक्कम आकारली आहे, अशी माहिती आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे यांनी दिली.

डेंग्यू, हिवताप आदी डासजन्य आजारांची साथ लक्षात घेता महापालिकेकडून क्षेत्रीय स्तरावर जून महिन्यापासून कंटेनर सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षणादरम्यान गेल्या अडीच महिन्यांत 1 जूनपासून 17 ऑगस्टपर्यंत 2 लाख 19 हजार 628 घरे तपासण्यात आली. त्यापैकी 3 हजार 884 घरांमध्ये डास अळ्या आढळून आल्या आहेत. 10 लाख 80 हजार 402 कंटेनर तपासले. त्यातील 4 हजार 585 कंटेनरमध्ये डास अळ्या आढळल्या आहेत.

टायर, पंक्चर, भंगाराची दुकानेही तपासली

शहरातील टायर, पंक्चर आणि भंगार मालाची 874 दुकाने आरोग्य विभागाकडून तपासण्यात आली. तर, 1 हजार 52 बांधकामे तपासण्यात आली आहेत. त्यामध्ये डास अळ्या आढळलेल्या आस्थापनांना नोटिसा बजावणे, दंडात्मक कारवाई करणे अशा स्वरुपाची कारवाई केलेली आहे.

शहरात वाढतोय डेंग्यूचा कहर;

शहरामध्ये डेंग्यूचा कहर वाढत चालला आहे. गेल्या दीड महिन्यात 70 रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. जुलैमध्ये 36 रुग्णांना डेंग्यूची लागण झाली होती. तर, ऑगस्ट महिन्यातील गेल्या 18 दिवसांतच 34 रुग्णांना डेंग्यू झाला आहे.

संशयित रुग्ण जानेवारीपासून; परंतु लागण झाली जुलैपासून

पिंपरी-चिंचवड परिसरात जानेवारी महिन्यापासून डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. तथापि, प्रत्यक्ष लागण झालेले रुग्ण जुलै महिन्यापासून दृष्टिक्षेपात येत आहेत. जानेवारीत 261 संशयित रुग्ण होते. फेबु्रवारीमध्ये ही संख्या निम्म्याने कमी झाली. केवळ 130 संशयित रुग्ण आढळले. त्यानंतर मार्चमध्ये पुन्हा ही संख्या निम्म्यापेक्षा अधिक कमी झाली. 51 संशयित रुग्ण आढळले.

त्यानंतर एप्रिलपासून मात्र, संशयित रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली. एप्रिल – 88, मे -100, जून – 472, जुलै – 1432, तर, ऑगस्टमध्ये 18 तारखेपर्यंत 1104 संशयित रुग्ण आढळून आले. जानेवारीपासून संशयित रुग्ण आढळत असले तरीही जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांतच प्रत्यक्ष लागण झालेले रुग्ण आढळले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news